छत्रपती संभाजीनगरात धनंजय मुंडे, अजीत पवारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:21 IST2025-03-04T18:20:21+5:302025-03-04T18:21:19+5:30
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत आंदोलन करण्यात आले आहेत

छत्रपती संभाजीनगरात धनंजय मुंडे, अजीत पवारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने
छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख यांचा अमानवीय छळ करुन निर्घृण हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने केली. या हत्येची छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा संतप्त झाला. या प्रकरणात आरोपींना पाठिशी घालणाऱ्या आ. धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने मंगळवारी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कराड आणि मुंडेच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारले आणि या प्रतिमा जाळून टाकल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत आंदोलन करण्यात येतात. देशमुख यांच्या हत्या करीत असताना खिदळणारे आरोपींची छायाचित्रे सोमवारी रात्री समाजमाध्यमावंर व्हायरल झाली. ही छायाचित्रे पाहुन संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी क्रांतीचाैक येथे जोरदार निदर्शने केली. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, धनंजय मुंडे हाय हाय,अजीत पवार हाय हाय, धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे, संतोषभैय्यांना न्याय मिळालाच पाहिजे, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा आंदोलक देत हाेते.
यावेळी आंदोलकांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या प्रतिमांना जोडे मारले आणि या प्रतिमा पायदळी तुडवून जाळून टाकल्या. या आंदोलनात प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, वैभव भगत, सुनील कोटकर, ॲड. दत्ता हुड, पंढरीनाथ गोडसे, निवृत्ती डक, विजय काकडे, नितीन कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, पंढरीनाथ काकडे, अतुल जाधव, सचिन हावळे,प्रा. मनीषा मराठे, रेखा वाहटुळे, कल्पना पाटील, तनुश्री चव्हाण आदींसह अन्य समाजबांधवांनी सहभाग नोंदविला.