Maratha Kranti Morcha : औरंगाबादमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:06 IST2018-07-23T16:29:36+5:302018-07-23T17:06:58+5:30
Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत

Maratha Kranti Morcha : औरंगाबादमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेतमराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतली होती.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने आज आक्रमक स्वरूप घेतले. आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरु करण्यात झाली. प्रथमतः या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. यानंतर आंदोलकांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली.यावेळी त्यांची या ठिकाणी तैनात तैनात पोलिसांसोबत वादावादी झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला,यातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने नदी पात्रात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित जमावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाहजोरात असल्याने काकासाहेब हे जवळपास 200 मीटर अंतरावर वाहत गेले.
ग्रामरक्षक दलाचे दशरथ बिरुटे यांनी त्याला प्रवाहातून काढून काठावर नेले. यानंतर त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती गंगापूर तालुक्यात वाऱ्यासारखी बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच आंदोलकांनी नगर रोडवर रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. नगर रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी रास्तारोको केले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
निवेदन देऊन दिला होता इशारा
गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी (दि. २३ ) कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.