अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:33 IST2025-04-30T12:32:34+5:302025-04-30T12:33:12+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनेक जागा पडून, आर्थिक स्थिती बिकट; तरी मनपा घेणार कोट्यवधींची जागा विकत
छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिराजवळील कडा कार्यालयाची पाच हजार चौरस फूट जागा विकत घेण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. रेडीरेकनर दरानुसार जागेची किंमत कोट्यवधींमध्ये जाईल. एवढी किंमत देण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली असून, कडा कार्यालयासोबत पत्रव्यवहारसुद्धा सुरू करण्यात आला आहे. हा भूखंड एका संकुलासाठी घेण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे वारंवार सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून भूखंड खरेदीच्या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. या जागा सोडून ‘कडा’च्या जागेवर नेमके कोणते संकुल उभारायचे आहे, हे गुलदस्त्यात आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारीसुद्धा भूखंड खरेदीच्या मुद्यावर उघडपणे बोलायला तयार नाहीत.
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने भूखंड खरेदीचा प्रस्ताव तयार केला असून, सध्या तो नगररचना विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अंदाजे ५ कोटी रुपये या जागेची किंमत निश्चित होईल. प्रस्तावात रस्ता व कमर्शिअल वापरासाठी जागा हवी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर रचना विभागातर्फे जागेची किंमत अंतिम केल्यानंतर पुढील व्यवहार होण्याची शक्यता आहे.
बांधकाम व्यावसायिकांची सोय?
महापालिका कडा कार्यालयाकडून पाच हजार चौरस फुटांचा भूखंड घेतल्यावर काही जागा रस्त्यासाठी देणार आहे. कडा कार्यालयाजवळ एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाला मोठा रस्ता नाही. त्याच्या सोयीसाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.
नियमानुसार कारवाई
महापालिकेने पाच हजार चौरस फूट जागेची मागणी संकुलासाठी केली आहे. नियमानुसार हा प्रस्ताव मंडळासमोर ठेवण्यात येईल. ठराव झाल्यानंतर शासकीय दरानुसार पैसे भरण्यासंदर्भात मनपाला प्रस्ताव दिला जाणार आहे.
- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा