मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 19:58 IST2023-09-21T19:55:11+5:302023-09-21T19:58:29+5:30
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार
छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर आता मनोज जरांगे यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, रुग्णालयातून घरी न जाता मनोज जरांगे अंतरवली सराटे गावात आंदोलनस्थळी पोहोचले आहेत, जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात केली आहेत.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला रुग्णालयात करमत नव्हतं, कारण आम्हाला मिळून राज्यातील मराठा जनतेला मराठा आरक्षण द्यायचे आहे. आमच आंदोलन अजुनही बंद नाही. साखळी उपोषण आमचे सुरुच आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता मी पुन्हा या साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. १४ ऑक्टोबरला आम्ही एक कार्यक्रम घेतला आहे. ४० दिवसानंतर आम्हाला आरक्षण पाहिजे आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
" ओबीसी बांधव कधीच नाराज नाही, सामान्य ओबीसी समाज आणि आम्ही एकोप्यानेच आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट ते १५सप्टेंबरपर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पेालिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला आणि गोळीबार केला होता. यात अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. या आंदोलकांवर शहरातील उल्कानगरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबई येथे उपचारासाठी येण्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी माझे गावकरी जेथे ॲडमिट आहेत, त्या हॉस्पिटलमध्येच मी उपचार घेतो, असे सांगितले होते.