‘आयआयएम’बाबत सकारात्मक निर्णय घेणार
By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-17T23:50:29+5:302014-12-18T00:42:19+5:30
औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात अभ्यासाअंती सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘आयआयएम’बाबत सकारात्मक निर्णय घेणार
औरंगाबाद : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात अभ्यासाअंती सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘आयआयएम’मराठवाडा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. समितीचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सर्वप्रथम सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची ओळख करून दिली.
सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी ‘आयआयएम’ही शिखर संस्था औरंगाबादेत का सुरू व्हावी आणि त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा कशा पद्धतीने उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती दिली. राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी मराठवाड्याला ही शिखर संस्था मिळाल्यास मागील अनेक वर्षांचा शैक्षणिक अनुशेष दूर होईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मराठवाड्यातील प्रश्न माहीत आहेत. अभ्यासाअंती आयआयएमचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
उद्धव ठाकरे यांचेही आश्वासन
‘आयआयएम’कृती समितीने सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यांनी दहा मिनिटे समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळीही मुकुंद कुलकर्णी यांनी ‘आयआयएम’संदर्भात बाजू मांडली. औरंगाबादेतच आयआयएम ही संस्था सुरू व्हावी या दृष्टीने आपण मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हा विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल आणि आयआयएम मराठवाड्याच्या पदरात कसे पडेल या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.
खैरे यांची लोकसभेत मागणी
डीएमआयसीसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादेत येत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादने औद्योगिक शहर म्हणून जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. येथील उद्योगाला आयआयएमची जोड मिळाल्यास मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल. त्यामुळे केंद्र शासनाने आयआयएमची शाखा औरंगाबादेतच सुरू करावी, अशी आग्रही मागणी खा.चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात आज केली.