आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 20:05 IST2026-04-07T20:05:30+5:302026-04-07T20:05:43+5:30
राज्यभरात गर्भपातासाठी कुख्यात डॉ. राजपूतचेही कनेक्शन असल्याचा दाट संशय; दोन बहिणीसह सिल्लोडच्या बीएएमएस डॉक्टरला अटक; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत
छत्रपती संभाजीनगर : महिन्याभराच्या अंतराने दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटने शहराला हादरवून टाकले. दोन सख्ख्या बहिणी व एका नर्सने मिळून घरातच विवाहितेचा गर्भपात करणे सुरू केले. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या रॅकेटचे धागेदोरे रेकॉर्डवरील गर्भपात करणाऱ्या कुख्यात डॉक्टरांपर्यंत पोहोचले असून, तब्बल ७० ते ८० हजार रुपयांचे पॅकेज कुटुंबाला सांगितले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
रविवारी सायंकाळी सातारा परिसरात सातारा पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. यात वर्षा बाबासाहेब जाधव व उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या दोघींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे महिला रुग्ण पाठविणाऱ्या डॉ. विकास मिठाराम आहेर (रा. निल्लोड, सिल्लोड) यालाही त्याच्या रुग्णालयातून अटक करण्यात आली. वर्षाची मुख्य साथीदार ज्योती पवार मात्र पसार झाली. पोलिस उपनिरीक्षक निर्मला राख व गोविंद एकिलवाले यांच्या पथकाने तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील सविता हिवराळे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांनी आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार
वर्षा जाधव व उज्ज्वला गायकवाड या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. वर्षा नर्स असून उज्ज्वला अल्पशिक्षित आहे. त्यांची आई परिसरात मसाले विकते. काही महिन्यांपर्यंत उज्ज्वला एका महाविद्यालयात साफसफाईचे काम करत होती; मात्र नंतर तिने बहिणीच्या दुष्कृत्यात सहभागी होत गर्भपातासाठी मदत सुरू केली. शहरात दहा वर्षांपासून सुरू असलेल्या फिरत्या गर्भपात केंद्र चालविणाऱ्या टोळीचा भाग असलेल्या वर्षाने संशय टाळण्यासाठी सातारा गावातील आईच्या घरातच गर्भपात सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
औषधे आणि हत्यारांचा साठा
वर्षा व उज्ज्वलाच्या घराच्या झाडाझडतीत परवानाधारक डॉक्टरांसाठी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या, वेदनाशामक इंजेक्शन, नर्सिंग कौन्सिलचा परवाना, कात्री, स्टेथॅस्कोप आढळले.
- पसार झालेल्या ज्योती पवार (रा. साई विश्व सोसायटी, म्हाडा कॉलनी, देवळाई) हिच्या घरातून २ गर्भपिशवी पाहणी उपकरणे, पॅड, १९ सर्जिकल ग्लोज, २ आयव्ही सेट, सुया, ६ पेक्षा अधिक इंजेक्शने, कॅन्युला फिक्सर, इन्स्ट्रुमेंट ट्रे व मोठ्या प्रमाणात औषधी जप्त करण्यात आली.
ती 'खुनी डायरी' जप्त
वर्षाच्या घरातून एक डायरी सापडली. त्यात गर्भपात कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची, केव्हा कोणती औषधे द्यायची आणि धोका कितपत पत्करायचा, याबाबत मार्गदर्शन होते. संकटकाळात मदत मिळवण्यासाठी काही डॉक्टर व रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांकही नोंदवलेले होते.
दुसरी मुलगी नको म्हणून टोकाचे पाऊल
रविवारी सापळ्यात सापडलेली गर्भवती महिला सिल्लोड तालुक्यातील आहे. गर्भधारणेनंतर तिच्यावर निल्लोड येथील बीएएमएस डॉ. विकास आहेर यांच्याकडे उपचार सुरू होते. त्यांनी तिला पुढील तपासणीसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवले. त्यानंतर तिला ज्योतीकडे पाठवले. नंतर वर्षा तिला घरी घेऊन गेली असताना पोलिसांनी छापा टाकला.
'नकोशी'चा ७० हजारांत सौदा
गर्भलिंग निदान चाचणी – २० हजार
गर्भपात – ३० हजार
विल्हेवाट – २० हजार
एकूण – ७० हजार
कुटुंबाच्या परिस्थितीनुसार या दरात चढउतार होत असल्याची माहिती आरोपींनी दिली.
पुन्हा 'सिल्लोड कनेक्शन' आणि डॉ. राजपूतचा संशय
निल्लोड येथून अटक केलेला डॉ. आहेर बीएएमएस डॉक्टर असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. पूर्वी छोटा दवाखाना चालवणाऱ्या आहेरने दोन वर्षांपूर्वी तीन मजली इमारत उभी केली. त्यात पहिल्या दोन मजल्यांवर रुग्णालय व लॅब असून वरच्या मजल्यावर तो राहतो. यापूर्वीच्या गर्भपात प्रकरणांमध्येही धागेदोरे भोकरदन व सिल्लोडपर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले होते.
पुढील तपासातील महत्त्वाचे प्रश्न
- डॉ. राजपूतचा या टोळीशी संबंध आहे का?
- औषधी कोण पुरवित होते?
- गर्भाची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जात होती?
- डायरीत नमूद डॉक्टरांची भूमिका काय?
मुकुंदवाडीत कचऱ्यात सापडला गर्भ
एकीकडे साताऱ्यात गर्भपात रॅकेट उघडकीस आले असताना, अज्ञातांनी अंदाजे चार ते पाच महिन्यांचा गर्भ रस्त्यावर फेकला. ६ एप्रिलला सकाळी ११ वाजता राजनगरात हा गर्भ आढळला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.