छत्रपती संभाजीनगरात महायुतीला तडे; १६० जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात, बंडखोरीचे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:27 IST2025-11-18T15:26:17+5:302025-11-18T15:27:05+5:30
पक्षनेते, पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना कुणी जुमानले नाही. त्यामुळे महायुतीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होतेय.

छत्रपती संभाजीनगरात महायुतीला तडे; १६० जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात, बंडखोरीचे संकेत!
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात उमेदवार ‘उदंड जाहले’ आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६९७ अर्ज नगरसेवकपदासाठी, तर ५३ अर्ज नगराध्यक्षपदासाठी आले. एकूण १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत नगरसेवकपदासाठी १ हजार ३१२ अर्ज आले असून, नगराध्यक्षपदासाठी ८८ जण रिंगणात येण्यासाठी उत्सुक आहेत. या निवडणुकीत महायुतीला तडे गेले असून, सोयीनुसार खेळ जमविण्याचा प्रयत्न उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्यामुळे महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले.
७ न.प.मध्ये १६० नगरसेवक पदांच्या जागांसाठी १३१२ उमेदवार मैदानात उतरले असून ७ नगराध्यक्षपदासाठी ८८ उमेदवार भाग्य आजमावणार आहेत. २६ तारखेपर्यंत माघार घेणाऱ्यांच्या संख्येवर काही ठिकाणी युती होईल, अशी आशा महायुतीला आहे. पैठणमध्ये सर्वाधिक २९० उमेदवार नगरसेवकपदासाठी आणि १४ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या मैदानात आहेत. उमेदवारांच्या इच्छेपुढे कुणाचेच काही चालले नाही. पक्षनेते, पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना कुणी जुमानले नाही. त्यामुळे महायुतीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होतेय.
१० ते १७ नोव्हेंबरपर्यंत आलेले उमेदवारी अर्ज....
नगर परिषद........उमेदवार नगरसेवक....नगराध्यक्ष
सिल्लाेड...............२२९...............१७
कन्नड.........१९२..........................०६
पैठण............२९०.........................१४
वैजापूर..........२१०....................०८
गंगापूर.............१२८...............१५
खुलताबाद..........१२६.............१६
फुलंब्री................१३७............१२
एकूण................१३१२...............८८
या तारखा आहेत महत्त्वाच्या....
- उमेदवार यादी प्रसिद्धी १८ नोव्हेंबर
- माघार, अर्ज छाननी, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी : २६ नोव्हेंबर
- मतदान २ डिसेंबर
- मतमोजणी ३ डिसेंबर
सात ठिकाणची परिस्थिती
सिल्लोडमध्ये भाजप व शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढण्याचे जवळपास निश्चित आहे. फुलंब्रीतही भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत भाजपची युती झाली, असून, शिंदेसेनेने स्वतंत्र उमेदवार दिले. येथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. वैजापूरमध्येही राष्ट्रवादी व भाजपची युती झाली असून येथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी असेल. गंगापूर व खुलताबादेत भाजप, शिंदेसेना स्वबळावर लढतील. पैठणमध्येही महायुतीतील सर्व पक्ष स्वबळावर लढतील.
भाजप आणि शिंदेसेनेत फाटले
जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेनेत कुठेही युतीचा मेळ जमलेला नाही. सातही नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीतील चारही पक्ष कुठेही एकत्र आलेले नाहीत. भाजप दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीत आहे. बाकी ठिकाणी स्बळावर लढेल.
तर भाजप स्वबळावर
कन्नड, वैजापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे. गंगापूर-खुलताबाद भाजप स्वबळावर लढणार आहे. कन्नडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगराध्यक्षपद दिले असून वैजापूरमध्ये भाजपचा उमेदवार असेल. शिंदेसेना स्वतंत्र आहे.
-संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष भाजप
आमनेसामनेची शक्यता....
अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबर या शेवटच्या दिवसापर्यंत शिंदेसेनेची महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती झाली नाही. सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र असले तरी न.प. निवडणुकीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यानंतरच युतीसंदर्भात बोलता येईल,
- संदीपान भुमरे, खासदार
महाविकास आघाडी एकत्र - खैरे
महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हे तीन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. उद्धवसेनेने सिल्लोड, गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि कन्नडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसला वैजापूर आणि खुलताबादचे नगराध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.