काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:34 IST2019-10-09T22:30:42+5:302019-10-09T22:34:07+5:30
हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले.

काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन
औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचा लोकसभेत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या पूर्वीच पराभव मान्य करत मैदान सोडल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केली.
मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या शहनवाज हुसैन यांनी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी लढाई करण्याच्या स्थितीत होते. मात्र आता काँग्रेस लढाईतच राहिली नाही.पाच वषार्पूर्वीपर्यंत काँग्रेस राज्यात सत्तेत होती. तीन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. तरी लढण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच मैदान सोडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप व शिवसेनेची मागील विधानसभा निवडणूकीत युती नव्हती. तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावेळी युती असल्यामुळे परिस्थिती अधिक भक्कम बनली आहे. एका जागेसाठी दहा-दहा उमेदवार स्पर्धेत होते. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराज व्हावे लागले. काही मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना सोडण्यात आल्यामुळे नाराजीची स्थिती होती. मात्र इच्छुकांची नाराजी दुर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी उद्भवनार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसह मराठवाड्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. मराठवाड्यातील अनेक भाग काँग्रेसमुक्त बनले आहेत. औरंगाबाद शहरही काँग्रेसमुक्त असल्याचे शहनवाज हुसैन यांनी सांगितले.
पंतप्रधान महात्मा गांधींच्या विचारांवर चालतात
काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांचे नाव घेतले. मात्र त्यांचे विचार सोडून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार चालत आहेत. गांधीजींनी सांगितलेली प्रत्येक विकासाचा विचार त्यांनी आत्मसात करुन त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचेही शहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.