अट गुपचुप काढली, महापारेषणच्या ऑपरेटर पदाच्या नोकरभरतीला खंडपीठात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:55 IST2025-10-20T16:55:00+5:302025-10-20T16:55:02+5:30
न्यायालयाने प्रकरणांतील प्रतिवादी महापारेषण कंपनी, एमएसईबी होल्डिंग कंपनी, आयबीपीएस आणि अन्य अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

अट गुपचुप काढली, महापारेषणच्या ऑपरेटर पदाच्या नोकरभरतीला खंडपीठात आव्हान
छत्रपती संभाजीनगर : महापारेषण कंपनीने सन २०२४मध्ये ऑपरेटर पदासाठी नोकर भरतीच्या जाहिरातीत कंत्राटी ऑपरेटर असलेल्या याचिकाकर्त्यांचे अनुभव या नोकरीसाठी पात्र नसल्याची अट टाकल्याने याचिकाकर्त्यांना या नोकरभरतीत सहभाग नोंदविता आला नाही. नंतर मात्र गुपचूप ही अट काढून भरतीप्रक्रिया उरकण्यात आली. या भरती प्रक्रियेत सहभागी घेता न आल्याने नाराज कंत्राटी ऑपरेटर्सनी या नोकरभरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने प्रकरणांतील प्रतिवादी महापारेषण कंपनी, एमएसईबी होल्डिंग कंपनी, आयबीपीएस आणि अन्य अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
याचिकाकर्ते सागर संजय घोडेचाेर आणि अन्य १८ जणांनी महापारेषण कंपनीच्या विविध ठिकाणी वीज केंद्रात कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव २ ते ८ वर्षे आहे. महावितरणने गतवर्षी जून २०२४मध्ये वरिष्ठ ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञची (ट्रान्समिशन) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरातीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. या जाहिरातीमध्ये कंत्राटदारांमार्फत केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. यामुळे याचिकाकर्त्यांना या नोकरभरतीसाठी अर्ज करता आले नव्हते.
आयबीपीएस या संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची निवड यादी जाहीर करून नियुक्तीपत्रही देण्यात आली आहेत. यात काही कंत्राटी ऑपरेटर्सचाही समावेश असल्याचे याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता महापारेषण कंपनीने भरती प्रक्रियेदरम्यान एमएसईबी होल्डिंग कंपनीची परवानगी न घेता कंत्राटी ऑपरेटर्स पदाचा अनुभव ग्राह्य नसेल ही अट काढून टाकली. याविषयीचे कोणतेही पत्रक प्रसिद्ध केले नव्हते. महापारेषण कंपनीच्या जाहिरातीमधील अटीमुळे आपल्याला या भरती प्रक्रियेत सहभाग घेता आला नाही, असे नमूद करीत याचिकाकर्त्यांनी या भरती प्रक्रियेला ॲड. नितीन एस. कद्राले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले. ही याचिका सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत.