गौडबंगाल! छत्रपती संभाजीनगरात १२५० सिलिंडरवर चालतात ६ हजार फूडकुकिंग आउटलेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:45 IST2026-03-25T17:44:18+5:302026-03-25T17:45:49+5:30
घरगुती गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराची शक्यता

गौडबंगाल! छत्रपती संभाजीनगरात १२५० सिलिंडरवर चालतात ६ हजार फूडकुकिंग आउटलेट
छत्रपती संभाजीनगर : शहरात व ग्रामीण भागात ५ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद आहे. हा पुरवठा बंद होऊन २० दिवस होत आले आहेत. या काळात कोळसा शेगड्या व डिझेल शेगड्यांचा वापर करून काही फूडकुकिंग आउटलेट (अन्नपदार्थ शिजवून विक्री करणारी प्रतिष्ठाने) सुरू असल्याचे दिसले.
१२५० व्यावसायिक गॅस सिलिंडरची रोज गरज असल्याचे सरकारी आकडे सांगत असून, या सिलिंडरवर जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंद असलेले ६ हजार फूडकुकिंग आउटलेट कसे चालतात, असा प्रश्न असून, आउटलेट व सिलिंडर यांच्या आकड्यातील तफावत संशयाला वाव निर्माण करणारी आहे. घरगुती सिलिंडरचा वापर तर या आउटलेटमध्ये होत नसेल ना, असा संशय बळावतोय. जिल्हा पुरवठा विभागाने थातूरमातूर कारवाया केल्याचे दिसते.
घरगुती सिलिंडरची ओरड कायम
घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची गॅस एजन्सीसमोरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. ऑनलाइन नोंदणीची सिस्टम सुरळीत चालत नाही. सिलिंडर नोंदणीनंतर आठवडाभर उलटूनही मिळणे अवघड आहे. अशी परिस्थिती एकीकडे असताना शहर व ग्रामीण भागातील फूडकुकिंग आउटलेट कशावर सुरू आहेत, असा प्रश्न आहे. व्यावसायिक गॅस न मिळाल्यास तारांबळ होईल, अशी ओरड सुरुवातीस झाली; परंतु सध्या फक्त घरगुती गॅसधारक नागरिकांची ओरड दिसते.
जिल्ह्यात ६ हजार नोंदणी
जिल्ह्यात ग्रामीण भागात २, तर शहरात ४ हजार ४६ हॉटेल्स, रेस्टाॅरंट, अन्ननिर्मिती केंद्र, केटरिंग, विविध कॅन्टीन, ढाब्यांची अन्न व औषधी प्रशासनाकडे ऑनलाइन नोंद आहे.
-दयानंद पाटील, सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन
१२५० व्यावसायिक सिलिंडरची गरज
शहरात रोज १२५० व्यावसायिक सिलिंडरची गरज पडते. ५ मार्चपासून व्यावसायिकचा पुरवठा बंद असून, नवीन निर्णयाबाबत सूचना नाही.
-जिल्हा पुरवठा विभाग
पुरवठा विभागाने केलेल्या कारवाया
१५ मार्च : ६२ हॉटेल तपासले, ३ घरगुती सिलिंडर जप्त.
१६ मार्च : १६७ हाॅटेल तपासले, ३८ घरगुती सिलिंडर जप्त.
१७ मार्च : ५९ हॉटेल तपासले, ८ घरगुती सिलिंडर जप्त.
१८ मार्च : वाळूजमधील एजिस ॲम्फल्स व्हायल्स लि. कंपनीतून रिक्त घरगुती सिलिंडर २२९ व व्यावसायिक १६७ सिलिंडर जप्त.
१८ मार्च : ५१ हॉटेल, खानावळ तपासणीत घरगुती सात, तर शहानूरमियाँ दर्गा चौकाजवळ ७६ सिलिंडर जप्त.
व्यावसायिक गॅसचा निर्णय पत्रावरच
केंद्र सरकारने उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी व्यावसायिक गॅस वाटप ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने २२ मार्च रोजी शासनाला पत्र दिले. जिल्ह्यात औद्याेगिक व व्यावसायिक सिलिंडरबाबत मंगळवारीदेखील शासनाकडून कुठल्याही सूचना पुरवठा विभागाला आल्या नाहीत.