'पोटातील बाळ माझे नाही', प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीचा संशय, मारहाणीत तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:46 IST2024-12-23T11:46:02+5:302024-12-23T11:46:10+5:30

या प्रकरणी पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Love marriage six months ago, pregnant woman dies after being beaten up over suspicion of character | 'पोटातील बाळ माझे नाही', प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीचा संशय, मारहाणीत तरुणीचा मृत्यू

'पोटातील बाळ माझे नाही', प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीचा संशय, मारहाणीत तरुणीचा मृत्यू

वाळूज महानगर : सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या गभर्वती तरुणीचा पतीने संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटातील बाळ आपले नाही, या संशयातून तिला व पहिल्या पतीपासून झालेल्या तिच्या चार वर्षीय मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी जहीर नजीर शेख (वय २०) व त्याची आई नाझिया नजीर शेख (रा. जोगेश्वरी) यांच्या विरोधात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून २२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव सिमरन परसराम बाथम (२९, रा. सिंधी कॅम्प, ग्वालियर, मध्य प्रदेश) असे आहे. सिमरनच्या वडिलांचे २०१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर वर्षभराने ती वाळूज महानगरात आली. सात वर्षांपूर्वी तिचा बाबा सय्यद याच्याशी प्रेमविवाह झाला. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. बाबासोबत पटत नसल्याने, ती विभक्त झाली.

याच दरम्यान तिची ओळख जहीरसोबत झाली. पुढे दोघांनी नोटरी पद्धतीने २२ जून २०२४ रोजी विवाह केला. नंतर ती दोन महिन्यांची गर्भवती राहिली; परंतु पोटातील बाळ आपले नसल्याच्या संशयातून व इतरही कारणांवरून पती तिला व तिच्या मुलाला बेदम मारहाण करायचा, असे तिने व्हिडीओ कॉलद्वारे अनेकदा तिच्या आईला सांगितले होते.

कुकर्माची जबरदस्ती
नोव्हेंबरमध्ये सिमरन माहेरी गेली होती, त्यावेळी तिने आईशी बोलताना आपला पती, पैशांसाठी पुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तसे न केल्यास तो मला आणि चार वर्षांच्या मुलाला मारहाण करतो. यात आपली सासूसुद्धा पतीची साथ देत असल्याचे सांगितले होते. तर १९ डिसेंबर रोजी दुपारी सिमरनने आईला व्हिडीओ कॉल करून, पती आणि सासू पोटात लाथा मारत असल्याचे आणि जबरदस्ती काही तरी खायला देत असल्याचे सांगितले होते. त्यातून सिमरनची तब्येत बिघडली. एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी तिला घाटीत रवाना करण्यास सांगितले. घाटी येथील डॉक्टरांनी सिमरनला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, सिमरनची आई फुलवती या नातेवाइकांसह ग्वाल्हेरहून आल्या. त्यांनी सुरुवातीला अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला; परंतु पो.नि. कृष्णा शिंदे यांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर २१ डिसेंबर रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Love marriage six months ago, pregnant woman dies after being beaten up over suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.