शिक्षणक्षेत्राच्या आधारवड पद्मश्री फातमा रफिक झकेरिया यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 12:08 IST2021-04-07T12:07:27+5:302021-04-07T12:08:16+5:30
१९३६ मध्ये जन्मलेल्या फातमा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली होती.

शिक्षणक्षेत्राच्या आधारवड पद्मश्री फातमा रफिक झकेरिया यांचे निधन
औरंगाबाद : मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा तथा पद्मश्री फातमा रफिक झकेरिया (८५) यांचे मंगळवारी (दि.६) दुपारी शहरातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सकाळी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये नमाज-ए-जनाजा आणि रफिक झकेरिया यांच्या कबरजवळ दफनविधी करण्यात येणार आहे. फातमा झकेरिया यांच्या पश्चात अरशद आणि फरीद ही दोन मुले आहेत. दोन्ही मुले अमेरिकेत आहेत.
मागील दोन दशकांपासून त्या शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण वेळ काम करीत होत्या. त्यांच्या कार्याची दखल केंद्र शासनाने २००६ मध्ये घेतली होती. पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. १९३६ मध्ये जन्मलेल्या फातमा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली होती. डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबाद शहरात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या निधनानंतर हा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी मागील दोन दशकांपासून फातमा यांनी स्वीकारली होती.
शैक्षणिक विकासात त्यांचे मोठे योगदान
श्रीमती फातमा रफिक झकेरिया यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे. पत्रकारितेतील महनीय व्यक्ती, शिक्षण तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशी त्यांची बहुमुखी ओळख होती. डॉ. रफिक झकेरिया साहेब आणि फातमा मॅडम या दोघांशीही माझे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आणि मला मार्गदर्शनही केले. फातमा या औरंगाबादलाच स्थायिक झाल्या होत्या आणि या विभागाच्या शैक्षणिक विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.
- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत
शहराचे मोठे नुकसान
प्रसिद्ध पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री फातमा झकेरिया यांचे निधन खरोखर शहराचे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. लाखो विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या असंख्य संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे पती डॉ. रफिक झकेरिया यांच्या निधनानंतर त्यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमधील विशेषतः गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मोठे काम पुढे नेले. आम्हाला फक्त अशी आशा आहे की मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टने यापुढेही चांगले कार्य सुरू ठेवून, औरंगाबादमध्ये शिक्षणाची नवीन केंद्रे उघडवावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- इम्तियाज जलील, खासदार.
शिक्षण, सामाजिक हानी
फातमा झकेरिया यांची चार महिन्यांपूर्वीच माझी भेट झाली होती. विविध विषयांवर चर्चा झाली. डॉ. रफिक झकेरिया यांनी पवित्र धर्मग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला. तेव्हा फातमा यांनी त्यांना खूप मिठी साथ दिली. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मोऔलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या दुःखात मी सहभागी आहे.
- अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री