अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:50 IST2022-03-04T18:50:14+5:302022-03-04T18:50:51+5:30
अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली. तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

अति वेगाने जीव गमावला; भरधाव दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार
पैठण ( औरंगाबाद): पैठण-पाचोड रोडवरील जायकवाडी कालव्याच्या पुलालगत आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन जण जागीच ठार झाले आहेत. नितीन कडुबा साबळे (२९, जोगेश्वरी वाळुज,औरंगाबाद ) व गणेश एकनाथ शेळके (३२, रा. खुंठेफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ) अशी मृतांची नावे आहेत.
गणेश शेळके हा कुतुबखेडा येथे कुंकवाचा कार्यक्रम आटोपून मित्रा सोबत बुलेटवरुन पैठणकडे येत होता. तर, नितीन कडुबा साबळे पत्नीला 12 वीच्या परीक्षेसाठी पैठण येथील परीक्षा केंद्रावर सोडून पाहुण्यांकडे जाण्यासाठी पाचोडच्या दिशेने जात होते. कालव्याच्या वळणावर दोन्ही भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बुलेटवर पाठीमागे बसलेला युवक रस्त्यापासून दुर फेकला गेला तर गणेश एकनाथ शेळके व नितीन साबळे हे दोघे तरुण जागीच ठार झाले. अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, रामकृष्ण सांगडे, सुधाकर चव्हाण, यांच्या सह पो. काँ.अनिरुद्ध शिंदे , सुधीर वाव्हळ, गोपाळ पाटील, मनोज वैद्य, गौतम बनकर, रमेश शेळके, चंद्रकांत तारू आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
वळणावर होतात सातत्याने अपघात
अपघातानंतर एक दुचाकी रस्त्यापासून दोनशे मिटर अंतरावर फेकली गेली. तर बुलेटच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. बुलेटवर पाठीमागे बसलेला व्यक्ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर फेकला गेला, यावरून या अपघाताची भीषणता समोर येतेय. दरम्यान, पैठण-पाचोड रोडवर कालवा पुलाच्या दोन्ही बाजुची वळणे जीवघेणी ठरत आहेत. इथे सातत्याने अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.