छत्रपती संभाजीनगरात लूटमार सुरूच; पत्ता विचारून दुचाकीस्वारांनी महिलेचे गंठण हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:55 IST2025-09-10T19:55:16+5:302025-09-10T19:55:43+5:30
बारा तासांत सिडकोसह पुंडलिकनगरमध्ये दोन महिला लक्ष्य

छत्रपती संभाजीनगरात लूटमार सुरूच; पत्ता विचारून दुचाकीस्वारांनी महिलेचे गंठण हिसकावले
छत्रपती संभाजीनगर : शहरात महिला, ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरूच असून, छावणी, एमजीएम परिसरासह पुंडलिकनगरमध्ये तीन महिलांना लक्ष्य करीत दुचाकीस्वार चोरांंनी एकूण पाच तोळ्यांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या.
पार्वती राठोड (७२, रा. सह्याद्रीनगर, पुंडलिकनगर) या पतीसह मंगळवारी सकाळी माॅर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. ७ वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराकडून दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सह्याद्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यातील एकाने त्यांना थांबवून इमारतीचे नाव विचारले. पार्वती यांनी मान वळवताच मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसका देऊन तोडत पोबारा केला. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, सुनील म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
एमजीएम परिसरातही ज्येष्ठ महिलाच लक्ष्य
निवृत्त शिक्षिका अंजली भाले (६३, रा. टाऊन सेंटर) या ८ सप्टेंबर रोजी रात्री ८:१५ वाजता टाऊन सेंटरच्या दिशेने पतीसह पायी जात होत्या. दुचाकीस्वार चोरांनी रंजलकर रुग्णालयाच्या कोपऱ्यावर त्यांचे २ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. ७ सप्टेंबर रोजी छावणीच्या अमुल चौकात जाता बन्सवाल यांचे ६ ग्रॅम व १२ मणी असलेले मंगळसूत्र हिसकावून नेले.
लूटमार थांबवण्यात पोलिस अपयशी
एकट्या ऑगस्ट महिन्यात शहरात लुटमारीच्या २१ घटना घडल्या. आठ महिन्यांत लुटमारीने ७० चा आकडा ओलांडला. मात्र अद्याप एकाही सोनसाखळी चोरीच्या घटनेची पोलिसांना उकल करता आलेली नाही. पुंडलिकनगरच्या घटनेत लुटारूंकडे महागडी विनाक्रमांक स्पोर्ट बाइक होती. दोघांनी हेल्मेट परिधान केले होते.