लोकसभा : आज मतमोजणी
By Admin | Updated: May 16, 2014 00:15 IST2014-05-15T23:47:44+5:302014-05-16T00:15:10+5:30
उस्मानाबाद: लोकसभा निवडणुकीची शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे़

लोकसभा : आज मतमोजणी
उस्मानाबाद: लोकसभा निवडणुकीची शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे़ उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात होणार्या मतमोजणी पूर्वतयारीचा निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ रमेश नारनवरे यांनी पाहणी करून आढावा घेतला़ आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी करण्यासाठी १४ टेबलांची मांडणी करण्यात आली आहे़ प्रारंभी टपाली मतपत्रिकेची नोंदणी होणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतमोजणी करण्यात येणार्या कक्षांची पाहणी केली़ उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी ६़४५ वाजता बोलविण्यात आले आहे़ ज्या मार्गावरून संबंधितांना प्रवेश आहे, त्याच मार्गावरून त्यांनी प्रवेश करावा, ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाऊ नये आदी सूचना त्यांनी केल्या़ उमेदवार किंवा प्रतिनिधींना केंद्रात प्रवेश करताना मोबाईल व आधुनिक संपर्क साधने नेण्यास मनाई करण्यात आली आहे़ मतदान मोजणी केंद्रातून इतर विधानसभा मतदान मोजणी केंद्रात प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्यास अशा मतमोजणी प्रतिनिधींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख जे़टी़पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे व सर्व मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी) संवेदनशील गावात बंदोबस्त मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संवेदनशील गावांसह ठिकाणांवरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ अशा गावांमध्ये फिरते पथक, फिक्स पॉइंटवर पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत़ कायदा-सुव्यवस्था बिघडवू पाहणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे़ प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यात १६ ते १८ मे या कालावधीत कलम १३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत़ या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़