Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
By दीपक भातुसे | Updated: June 10, 2025 05:36 IST2025-06-10T05:35:42+5:302025-06-10T05:36:49+5:30
Ladki Bahin Yojana Eligibility: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
दीपक भातुसे
मुंबई : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल.
२.५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, तरी बहिणींचे अर्ज
सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, ही अट घातली होती. मात्र, ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. एकूण संख्या २ कोटी ५२ लाखांच्या घरात गेली.