संगीत ऐकणं आनंदासोबतच आरोग्यदायी; सुरातून मेंदूला ऊर्जा, आनंददायी हार्मोन्सची होते निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:18 IST2025-06-21T19:15:27+5:302025-06-21T19:18:57+5:30

मन प्रसन्न करण्यासाठी प्रहरानुसार राग ऐकल्यासही अधिक लाभ

Listening to music is not only enjoyable but also healthy; music energizes the brain and produces happy hormones. | संगीत ऐकणं आनंदासोबतच आरोग्यदायी; सुरातून मेंदूला ऊर्जा, आनंददायी हार्मोन्सची होते निर्मिती

संगीत ऐकणं आनंदासोबतच आरोग्यदायी; सुरातून मेंदूला ऊर्जा, आनंददायी हार्मोन्सची होते निर्मिती

- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर :
संगीत फार पूर्वीपासून माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक राहिले आहे. संगीत ऐकणे हा केवळ आनंद मिळवण्याचा मार्ग नसून, आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाणारे एक प्रभावी साधन बनत चालले आहे. आज अनेक वैद्यकीय उपचारपद्धतींमध्ये संगीताचा उपयोग केला जातो. तणावमुक्ती, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, मानसिक शांततेसाठी संगीत जादूसारखे काम करते. संगीतामुळे मेंदूत डोपामाइन व ऑक्सिटॉसिनसारखे आनंद निर्माण करणारे हार्मोन्स स्रवतात. ज्यामुळे तणाव कमी होतो. योगसाधना, ध्यान, रुग्णोपचार केंद्रे, मानसिक आरोग्य क्षेत्रामध्येही संगीताचा प्रभावी वापर केला जात आहे.

या रुग्णालयात संगीत ऐकवले जाते
कोरोनादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना संगीत ऐकवले जात असे. ज्यामुळे त्यांच्या मनावर आलेला ताण आणि दडपण कमी होण्यास मदत झाली. शहरात शासकीय कर्करोग रुग्णालयात रुग्णांवर संगीत थेरपीद्वारे देखील उपचार केले जातात.

प्रहरानुसार रागदारी ऐका
म्युझिक थेरपी ही एक उपचार पद्धती आहे. संगीताचा वापर करून मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्य सुधारले जाते. माझ्याकडे मोठमोठ्या पदांवरील अधिकारी ताणतणावावरील थेरपीसाठी येतात. जुने लोक शेतातून परतले की, भजन ऐकायला जायचे. तणाव कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या रागदारी ऐकवतो. प्रहरानुसार रागदारी ऐकल्यास जास्त लाभ होऊ शकतो. तसेच, ओमकाराचा रियाजही महत्त्वाचा आहे. ब्रेन स्ट्रोक झालेल्या रुग्णांवरही मी संगीताद्वारे उपचार केलेले आहेत.
-दीपक गिरी, संगीतकार

मानसिक स्वास्थ्य सुधारते
अस्वस्थ वाटणे, डिप्रेशन यांसारखे मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर मी संगीतातून यशस्वीपणे उपचार केले आहेत. रुग्णांना औषध दिल्यास त्यांची सवय होते. त्यामुळे संगीत थेरपी प्रभावी ठरते. रुग्णांना ‘गाणे गा’ हा उपाय हमखास सांगतो. गाणे ऐकताना मन केंद्रित झाले नाही, तरी गाताना लक्ष केंद्रित होते. संगीत उपचारांमुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. मनाला भावेल ते गाणे ऐका. फक्त ते रडके गाणे नसावेत.
डॉ. अनंत कडेठाणकर, वैद्यकीय, संगीत तज्ज्ञ

विविध आजारांसाठी विविध रागांची मात्रा
विविध शारीरिक व्याधींवर संगीत आणि योग या दोन्हींद्वारे उपचार होऊ शकतात. दुर्धर आजारांवर शास्त्रीय संगीतामुळे काही अंशी नियंत्रण नक्कीच मिळवता येते. रागदारी ऐकल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. राग मालकंस कॅन्सरदरम्यान दिल्या जाणाऱ्या किमोथेरपीत होणाऱ्या वेदना कमी करते. प्राण्यांवरही संगीताचा परिणाम होतो. राग दरबारी कानडामुळे मानसिक त्रास कमी होतो. राग हमीरमुळे हृदयविकार असणाऱ्यांना फायदा होतो. सकाळी तोडी राग ऐकल्यास दिवस चांगला जातो. सामान्य प्रसूतीसाठी यमन राग ऐकायला हवा.
- प्रसाद साडेगावकर, सुप्रसिद्ध सुगम गायक

Web Title: Listening to music is not only enjoyable but also healthy; music energizes the brain and produces happy hormones.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.