सिद्धार्थ उद्यानात 'सिंहाची डरकाळी'; वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणले ६ नवे पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:31 IST2025-09-27T15:30:30+5:302025-09-27T15:31:18+5:30
सिद्धार्थ उद्यानात 'कर्नाटकी पाहुणे'; दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

सिद्धार्थ उद्यानात 'सिंहाची डरकाळी'; वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणले ६ नवे पाहुणे
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयातून दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे असे एकूण सहा नवे पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानाने शिवमोगा प्राणिसंग्रहालयाला एक पांढरा वाघ (विक्रम) आणि दोन पिवळ्या वाघिणी (रोहिणी आणि श्रावणी) दिल्या आहेत.
वाघांची संख्या जास्त असल्याने निर्णय
सिद्धार्थ उद्यान प्रशासनाकडे पिवळ्या वाघांची संख्या जास्त झाली होती, तर त्यांना ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पिंजरेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे वाघांची मागणी केली होती. प्राधिकरणाने मागील महिन्यात या अदलाबदलीला मंजुरी दिली. शिवमोगा येथील दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने ११ ऑगस्ट रोजी उद्यानातील वाघांची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमोगा येथील प्राणिसंग्रहालय तब्बल ६०० एकर परिसरात असून, तिथे स्वतंत्र सफारी पार्कही आहे.
दोन दिवसांत प्रेक्षकांना भेट
सध्या नवीन ठिकाणी आलेल्या या सहाही प्राण्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला काही दिवस त्यांच्या पिंजऱ्यातच ठेवले जाणार आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे आरोग्य तपासले जात आहे. प्राणी उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांत हे प्राणी पूर्णपणे जुळवून घेतील. त्यानंतर त्यांना मोकळ्या पिंजऱ्यात सोडले जाईल आणि ते प्रेक्षकांसाठी पाहणीकरिता उपलब्ध होतील. ही अदलाबदल योजना प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, यामुळे दोन्ही प्राणिसंग्रहालयांना नवीन प्रजातींचा अनुभव घेता येत असल्याने प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे.