आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:03 IST2022-01-12T13:01:17+5:302022-01-12T13:03:55+5:30
Cyber Crime in Aurangabad: आभासी यंत्र खरेदी करा, परतावा मिळवा, पण पडले महागात

आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना
औरंगाबाद : मोबाईलवर आलेल्या लिंकनंतर ॲप डाऊनलोड करा आणि आभासी यंत्र खरेदी करून पैसे गुंतवून हजारो रुपयांचा परतावा मिळण्याच्या आमिषाने शहरातील अंदाजे १४०० नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले जाते. मात्र, तरीही नागरिक फसत असल्याचे शहरातील आणखी एका नव्या प्रकाराने समोर आला आहे. शहरातील काहींनी मोबाईलवर आलेल्या लिंकवरून केएनसी नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपमध्ये दिसणारे यंत्र खरेदी केल्यानंतर पुढील काही दिवस रोज काही ठरावीक रक्कम मिळते, असे सांगण्यात आले. यंत्र खरेदी केल्यानंतर ते प्रत्यक्षात मिळत नाही. परंतु रोज पैसे मिळतात, असे सांगण्यात आले. ही बाब माहीत झाल्यानंतरही अनेकांनी आभासी पद्धतीने यंत्राची खरेदी केली. त्यांना काही दिवस पैसे मिळाले. मात्र १० जानेवारी रोजी अचानक ॲप बंद पडले आणि पैसे येणे बंद झाले. त्यानंतर जागे झालेल्या काही जणांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. मग आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
५५ हजार रु. गेले
योगेश साबळे म्हणाले की, केएनसी ॲपच्या माध्यमातून ७० हजार रुपये गुंतविले. मला १ लाख ४ हजार रुपये मिळाले. पैसे मिळाले म्हणून परत ७० हजार रुपये टाकले. परंतु पूर्ण पैसे येण्याआधी ॲप बंद झाले. ५५ हजार रुपयांची फसवणूक झाली. माझ्यासह शहरातील इतर तेराशे नागरिकांनी पैसे गुंतविले होते. आता आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. आम्ही फसलो. परंतु इतरांनी कोणत्याही ऑनलाईन आमिषाला बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये.
६० हजार बुडाले
एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले, महिनाभरापूर्वी मी ५८५ रुपयांचे यंत्र खरेदी केेले. पुढील ४७ दिवस रोज २४ रुपये मिळाले. त्यानंतर आणखी पैसे मोजून यंत्र खरेदी केले. परंतु आता ६० हजार रुपये बुडाले.