जायकवाडीच्या पाण्यात जीवघेणा 'स्टंट'! पाण्याखाली गेलेल्या पुलावरून बेफिकीरीने चालवली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:28 IST2025-08-30T18:27:03+5:302025-08-30T18:28:44+5:30

पुलावर पाणी असतानाही कार चालकाची बेफिकीरी. व्हिडिओ व्हायरल, आता कारवाईची मागणी.

Life-threatening 'stunt' in Jayakwadi water! Car carelessly driven over submerged bridge | जायकवाडीच्या पाण्यात जीवघेणा 'स्टंट'! पाण्याखाली गेलेल्या पुलावरून बेफिकीरीने चालवली कार

जायकवाडीच्या पाण्यात जीवघेणा 'स्टंट'! पाण्याखाली गेलेल्या पुलावरून बेफिकीरीने चालवली कार

पैठण: जायकवाडीच्या बॅकवॉटरमधील जुन्या दगडी पुलावर एका कार चालकाने केलेल्या स्टंटबाजीमुळे जनक्षोभ उसळला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अशा धोकादायक परिस्थितीत बेफिकीरीने वागणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून २७ हजार क्यूसेकपेक्षा जास्त पाणी सोडल्याने पैठण आणि कावसान गावांना जोडणाऱ्या जुन्या दगडी पुलावर गुडघाभर पाणी जमा झाले होते. प्रशासनाने याठिकाणी धोक्याचा सूचना फलक लावला होता. पुलावर पाणी साचल्यामुळे वाहतूक थांबवणे आणि लोकांना सुरक्षिततेचा इशारा देणे अपेक्षित होते. पण, गुरुवारी एका कार चालकाने मात्र सर्व नियमांना धाब्यावर बसवत पाण्यातून गाडी चालवत स्टंटबाजी केली. त्याचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये गाडी कशी पाण्यातून मार्ग काढते हे दिसते, पण यात चालकासह गाडीतील इतरांचे प्राण धोक्यात आले होते.

व्हिडिओ व्हायरल, कारवाईची मागणी
या घटनेमुळे, जायकवाडी पाटबंधारे विभागाने तातडीने पोलिसांना पत्र पाठवून या स्टंटबाज वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशा बेजबाबदार वर्तनामुळे कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. या प्रकरणात पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, यासाठी सूचना फलकीही लावलेले आहेत. बंदोबस्ताचे काम पोलिस व महसूल प्रशासनाचे असल्याचे शाखा अभियंता शेलार म्हणाले. 

Web Title: Life-threatening 'stunt' in Jayakwadi water! Car carelessly driven over submerged bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.