लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:27 IST2022-05-20T15:26:52+5:302022-05-20T15:27:05+5:30
काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत.

लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले
औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत. औरंगाबाद शहरातील बाजार समितीमध्ये आज अचानक लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. मार्च महिन्यात दोनशे रुपये किलो असलेला लिंबू आज अचानक 50-60 रुपये किलोवर आला आहे.
यासंदर्भात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी माहिती दिली की, परराज्यातून लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील लिंबाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. यासोबतच अचानकपणे वातावरणात झालेला बदल, वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस, याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून लिंबूला चांगली बाजारपेठ आणि चांगला भाव मिळाला होता यामध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र अचानकपणे इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक केल्याने जिल्ह्यातील लिंबाचे भाव पडले आहेत. अशी प्रतिक्रिया काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज रोजी दिली आहे. दरम्यान, या स्वस्त आणि महाग लिबांमध्ये फरकही पाहायला मिळत आहेत. काही लिंबू अनैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत, तर काही नैसर्गिक आहेत. त्यानुसार, लिंबांच्या दरांमध्ये फरकही दिसून येतोय.