मोबाइलसाठी घर सोडले, काम मिळेना, पैसे संपले; मुलाने स्वतःहून वडिलांना केला संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:43 IST2025-12-16T16:42:34+5:302025-12-16T16:43:25+5:30
'मोबाइल नको, अभ्यास कर' वडिलांनी रागावल्याने अकरावीतील मुलाची पुण्यात धाव

मोबाइलसाठी घर सोडले, काम मिळेना, पैसे संपले; मुलाने स्वतःहून वडिलांना केला संपर्क
छत्रपती संभाजीनगर: 'मोबाइलवर नको, अभ्यास कर' असे वडिलांनी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय अकरावीत शिकणाऱ्या मुलाने शनिवारी (दि. १३) रात्रीतून थेट घर सोडल्याची धक्कादायक घटना सिडको भागात उघडकीस आली आहे. मुलगा रागाच्या भरात पुण्यात पोहोचल्याचे कळताच, कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि वडिलांनी तातडीने पुण्यात धाव घेत मुलाला परत आणले.
जालना जिल्ह्यातील हे कुटुंब सध्या आपल्या १६ वर्षांच्या मुलासह सिडको परिसरात वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास वडील कामावरून घरी आले. त्यावेळी त्यांचा अकरावीत शिकणारा मुलगा मोबाइल बघत बसलेला होता. वडिलांनी त्याला 'मोबाइल बघू नको, अभ्यास कर' असे सांगून दिवसभर कुठे गेला होता याबद्दल रागावले. वडिलांचे हे बोलणे मुलाने मनाला लावून घेतले. रात्री साडेबारापर्यंत मुलगा घरी झोपलेला होता, मात्र सकाळी साडेपाच वाजता पाहिले तेव्हा तो घरातून निघून गेला होता.
फोन आला, जीवात जीव आला
मुलगा घरात दिसला नाही, तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला. पैसे संपल्यानंतर मुलाने स्वतः वडिलांना फोन करून तो पुण्यात असल्याचे सांगितले. काम शोधण्यासाठी एका कंपनीत गेला होता, असे त्याने वडिलांना सांगितले. मुलगा पुणे येथे असल्याचे समजताच, चिंतेत असलेल्या वडिलांच्या जीवात जीव आला. त्यांनी तातडीने सिडको पोलिसांना माहिती दिली आणि मुलाला घेण्यासाठी पुण्याची वाट धरली.