९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:12 IST2024-12-25T12:12:26+5:302024-12-25T12:12:40+5:30
२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे.

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तब्बल २०० कोटी रुपये खर्चून जायकवाडी ते फारोळा पर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आठ महिन्यांपूर्वी टाकली. आता या जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज असल्याचे उघडकीस येत आहे. जलवाहिनीचे जॉइंट व्यवस्थितपणे जोडण्यात आले नसल्याचे समोर येत आहे.
२,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला पुरेसे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने २०० कोटी रुपयांची जलवाहिनी अत्यंत घाईघाईत टाकण्यात आली. या जलवाहिनीतून शहराला ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून फक्त १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. सध्या ही जलवाहिनी टाकून शहराला फारसा दिलासा मिळालेला नाही. या जलवाहिनीसाठी २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथे तयार करण्यात येत आहे. दोन वर्षे होत आली तरी जलशुद्धीकरणाचे काम काही होईना. कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम होत नाही. त्यातच आता जलवाहिनीच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेवराई गाव येथे जलवाहिनीला लिकेज असल्याचे उघडकीस आले. त्यातून पाणी वाहत आहे. जलवाहिनी बंद केल्यावर दूषित पाणी पुन्हा त्यात जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्याप जलवाहिनी मनपाकडे हस्तांतरित केली नाही.
जलवाहिनीवर फक्त १ पंप सुरू
मागील सहा महिन्यांपासून जलवाहिनीवर सध्या एकच पंप चालविण्यात येत आहे. त्यातून १८ ते २० एमएलडी पाणी जलवाहिनीतून येत आहे. जेव्हा तीन पंप सुरू करून ७५ एमएलडी पाणी जलवाहिनीतून आणण्याचे काम सुरू होईल, तेव्हा अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटणार हे निश्चित. या जलवाहिनीचे जॉइंट अत्यंत कमकुवत दर्जाचे आहेत. फक्त एक पाईप दुसऱ्या पाईपमध्ये अडकवून सोडून देण्यात आले. प्रत्येक जॉइंट व्यवस्थित बसविला नसल्याचे दिसत आहे.