भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:58 IST2025-12-09T11:55:06+5:302025-12-09T11:58:23+5:30
एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे

भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज
छत्रपती संभाजीनगर : भाजपने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत सुमारे ११२० इच्छुकांनी अर्ज घेत सोमवारपर्यंत दाखल केले. इच्छुकांमध्ये माजी नगरसेवक, उपमहापौर यांच्यासह नेत्यांच्या मुलांसह संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे. २९ प्रभागांपैकी (११५ वॉर्ड) १६ प्रभागांत उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होईल. उर्वरित १३ प्रभागांत भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत. अर्जांची छाननी झाल्यानंतर वस्तुस्थिती समजेल.
एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही अर्जांच्या आकड्यांवरून दिसत आहेत.
महायुती झाली तर बंडखोरी निश्चित
महायुती झाली तर भाजपच्या वाट्याला २०२० पर्यंत असलेले २३ वॉर्ड म्हणजेच सुमारे ६ प्रभागांतील जागा येतील. त्यात माजी नगरसेवक, नेत्यांची मुलांचा आधी विचार होईल. त्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला ‘ॲडजस्ट’ करण्याचा प्रयत्न होऊ शकेल. महायुती झाल्यास बंडखोरी निश्चित होईल, असा दावा अनेक इच्छुकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
बाहेरून आलेल्या किती जणांनी घेतले अर्ज?
शिल्पाराणी वाडकर या गेल्या आठवड्यात पक्षात आल्या असून त्यांनी इच्छुक म्हणून पक्षाचा अर्ज घेतला आणि दाखल केला.
कोणत्या नेत्यांच्या मुलांचा अर्ज?
खा. डॉ. भागवत कराड यांच्या चिरंजीव हर्षवर्धन कराड, आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन केणेकर यांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले. तसेच डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनीही अर्ज दाखल केला.
माजी पदाधिकारी, नगरसेवकांपैकी इच्छुक
प्रमोद राठोड, विजय औताडे, साधना सुरडकर, संजय जोशी या माजी उपमहापौरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समितीमधील सुरेंद्र कुलकर्णी, दिलीप थोरात यांच्यासह नितीन चित्ते, रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर यांच्यासह २०१५ च्या यादीतील सुमारे २१ जणांनी अर्ज घेतले. समीर राजूरकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी अर्ज घेतले नाहीत.
नियोजनासाठी समिती
भाजपने स्वतंत्र संचालन समिती नेमून सर्वांना जबाबदारीचे वाटप केले आहे. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर मित्रपक्षाशी संपर्क ठेवण्याची तर माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये यांच्याकडे राष्ट्रीय तथा प्रदेश नेत्यांचे दौरे, सभा याचे नियोजन देण्यात आले आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, निवडणूक प्रमुखपदी समीर राजूरकर असतील. प्रचार कार्यालय प्रमुख धनंजय कुलकर्णी, निवडणूक अधिकारी संपर्क ॲड. अमित देशपांडे, मीडियाप्रमुख सतीश छापेकर, सोशल मीडियाप्रमुख प्रतीक शिरसे यांच्यासह श्रीनिवास देव, राजेश मेहता, बापू घडमोडे, प्रशांत देसरडा, मनोज पांगारकर, संजय खनाळे, मुकुंद लाडकेकर, डॉ. उज्ज्वला दहिफळे, राहुल दांडगे, अरविंद डोणगावकर, अशोक मुळे, गणेश जोशी यांच्यावर विविध कामांची जबाबदारी असेल.