जमिनीचा २९ वर्षांपासून वाद, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्लेखोरांची दादागिरी अन् हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:49 IST2025-12-19T15:48:10+5:302025-12-19T15:49:19+5:30
आरोपींचे दुकान अनधिकृत, माजी सरपंच दादा सांडू पठाण यांच्या नातेवाइकांचा आरोप, काही वेळ रस्ता रोको

जमिनीचा २९ वर्षांपासून वाद, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्लेखोरांची दादागिरी अन् हत्या
छत्रपती संभाजीनगर : ज्या जमिनीच्या वादातून जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (६८) यांची हत्या झाली, तो वाद गेल्या २९ वर्षांपासून सुरू आहे. पोलिस ठाण्यातील तक्रारीशिवाय याच जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे, तरीही हल्लेखोरांनी पठाण यांच्या हत्येपर्यंत मजल मारली. यात हर्सूल पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत एकूण चार आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले.
एके काळी ओव्हरगावचे सरपंच राहिलेल्या दादा पठाण यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जमिनीवरून गावातीलच एका कुटुंबासोबत त्यांचा वाद सुरू आहे. दादा पठाण मालक असलेल्या जागेवर त्या कुटुंबाने दावा करून त्रास देत होते. जमिनीलगतच्या रस्त्यावरून सुरू झालेला वाद कालांतराने पूर्ण जमिनीबाबत झाला. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. बुधवारी दुपारी पठाण जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण, असलम ऊर्फ गुड्डू खान गयाज खान पठाण, हैदर खान गयाज खान पठाण, समीर खान जमीर खान पठाण, उमेर खान जमीर खान पठाण, फुरकान खान अजगर खान पठाण, रामवतार सगरमल साबू व मोईन इनायतखान पठाण यांनी मिळून त्यांच्या मुलासह त्यांच्यावर हल्ला केला. यात दादा पठाण यांचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाले.
१९९६ पासून जमीन वादग्रस्त
पठाण आणि आरोपींमध्ये ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे, ती जमीन १९९६ पासून वादग्रस्त आहे. याच वादातून अनेकदा पोलिसांकडे तक्रार दाखल आहेत. शिवाय, दोन्ही गट न्यायालयात देखील गेले. सध्याही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या चार दिवस आधी याप्रकरणातून अदखलपात्र गुन्हा दाखल करून २४ तासांत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
हर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक सचिन सदाफुले, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गुरुवारी पहाटेपर्यंत इम्रान खान मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण (४२), समीर खान जमीर खान पठाण (३२), उमेर खान जमीर खान पठाण (२७) यांच्या मुसक्या आवळल्या. दौलताबाद व आसपासच्या परिसरात ते लपून बसले होते. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, उर्वरित सहा हल्लेखोरांसाठी गुन्हे शाखेसह हर्सूल पोलिसांचे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी तपास करत होते.
आरोपींचे दुकान अनधिकृत, पाडण्यासाठी रस्ता रोको
दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्याच घरासमोर फरसाण व मिठाईचे दुकान थाटले होते. हे दोन्ही दुकाने अनधिकृत असून ते तत्काळ पाडण्यासाठी पठाण यांचे संतप्त नातेवाईक, मित्र परिवाराने गुरुवारी दुपारी १ वाजता ओव्हरगावमध्येा आंदोलन केले. दुकान पाडेपर्यंत व सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी धाव घेत समजून घातल्यानंतर आंदोलन मागे घेऊन दादा पठाण यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.