"ना सिलिंडरची चिंता, ना रांगेची भीती!"; लाडगावकरांना 'पाइपलाइन गॅस' ठरतोय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:15 IST2026-03-26T20:14:01+5:302026-03-26T20:15:11+5:30

३ तीन वर्षांपूर्वीच पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू : ना सिलिंडर टंचाईची फिकीर, ना युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम

Ladgaon Village Beats LPG Crisis: 300 Households Enjoy Uninterrupted Piped Gas Supply Amid Global War Fear | "ना सिलिंडरची चिंता, ना रांगेची भीती!"; लाडगावकरांना 'पाइपलाइन गॅस' ठरतोय वरदान

"ना सिलिंडरची चिंता, ना रांगेची भीती!"; लाडगावकरांना 'पाइपलाइन गॅस' ठरतोय वरदान

- श्रीकांत पोफळे

करमाड : युद्धामुळे साऱ्या देशात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असताना, तालुक्यातील लाडगाव येथील नागरिक मात्र निर्धास्त आहेत. कारण, तीन वर्षांपूर्वीच घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा योजना सुरू करण्यात आली.

भारत पेट्रोलियमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन जवळपास ३०० घरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरू केला, तेव्हापासून पाइपलाइनद्वारे येत असलेल्या गॅसने स्वयंपाक होत असून, सध्या उद्भवलेल्या सिलेंडरच्या टंचाईची चिंता नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावर असलेल्या संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे १२ सप्टेंबर २०२३ ला भारत पेट्रोलियम कंपनीकडून घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा हा उपक्रम सुरू करण्यात आला. ३०० पेक्षा जास्त घरांना व गावठाण हद्दीजवळ असलेल्या काही हॉटेल व्यावसायिकांनी देखील या योजनेत पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू करून घेतला. या योजनेत लाभ घेते वेळी लाभार्थ्यांनी पाच हजार रुपये डिपॉझिट व एक हजार रुपये कनेक्शन जोडणी शुल्क भरले. प्रत्येक कनेक्शनला किती गॅस वापरला, हे दिसण्यासाठी मीटर बसविण्यात आले. मागील तीन वर्षांपासून ही योजना सुरळीत सुरू असून, २ वेळा पाइपलाइन लिकेज झाल्याची समस्या उद्भवली होती, मात्र अवघ्या पंधरा मिनिटांत कंपनीच्या कामगारांनी ही पाइपलाइन सुरळीत करून दिली.

कटकटीतून मुक्त
गावात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करणारी आमची मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. या योजनेमुळे नागरिकांची ३० टक्के आर्थिक बचत होत असून, सिलिंडरसाठी नोंदणी किंवा प्रतीक्षेच्या कटकटीतून मुक्त असल्याने समाधान आहे.
- जयश्री बागल, सरपंच लाडगाव/हिवरा ग्रुप ग्रामपंचायत

हॉटेलचा गॅसपुरवठा अखंड
माझ्या हॉटेलवर या योजनेतून व्यावसायिक दराने गॅसपुरवठा सुरू केलेला आहे, मात्र मला सिलिंडरपेक्षा कमी खर्च येत असून, सध्या सुरू असलेल्या टंचाई काळातही माझ्या हॉटेलचा गॅसपुरवठा अखंड सुरू आहे.
-सुंदर बागल, हॉटेल व्यावसायिक.

Web Title : लाडगाँव के निवासियों को पाइपलाइन गैस से लाभ, सिलेंडर की चिंता नहीं।

Web Summary : लाडगाँव पाइपलाइन के माध्यम से निर्बाध गैस आपूर्ति का आनंद लेता है, जो सिलेंडर की कमी के दौरान एक वरदान है। भारत पेट्रोलियम द्वारा ग्राम पंचायत के समर्थन से तीन साल पहले शुरू की गई योजना में 300 घर शामिल हैं, जिससे निवासियों के पैसे की बचत होती है और सिलेंडर की परेशानी खत्म हो जाती है।

Web Title : Ladgaon residents benefit from pipeline gas, avoiding cylinder woes.

Web Summary : Ladgaon enjoys uninterrupted gas supply via pipeline, a boon during cylinder shortages. Initiated three years ago by Bharat Petroleum with Gram Panchayat support, the scheme covers 300 homes, saving residents money and eliminating cylinder hassles.