आमच्या वाट्याला प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने, बाकी अमोलने स्वत:कडे ठेवले: दरोडेखोरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:22 IST2025-06-06T12:22:01+5:302025-06-06T12:22:08+5:30

नांदेडला सोने विकणाऱ्या तिघांसह सराफ्याला अटक; ५.५ किलो पैकी ६० तोळे सोने हस्तगत

Ladda Robbery case: We got only 200 grams of gold each, Amol Khotkar kept the rest for himself: Robbers claim | आमच्या वाट्याला प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने, बाकी अमोलने स्वत:कडे ठेवले: दरोडेखोरांचा दावा

आमच्या वाट्याला प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने, बाकी अमोलने स्वत:कडे ठेवले: दरोडेखोरांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्याेजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडाप्रकरणी २१ दिवसांनंतर पोलिसांना ६० तोळे सोने हस्तगत करण्यात यश आले. यात अंबेजोगाईचा सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (वय ४५, रा. अंबेजोगाई) याने विकलेल्या १९४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करत त्याचे तीन साथीदार व नांदेडच्या सराफा व्यावसायिकाला अटक करण्यात आली. त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे.

राज्यभर चर्चेत आलेल्या लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात २५ मे रोजी अमाेलच्या एन्काऊंटरनंतर ३१ मे रोजी गुन्हे शाखेने या संपूर्ण घटनेचा यशस्वीरीत्या उलगडा केला. लड्डा यांचा बालमित्र बालासाहेब चंद्रकांत इंगोले (४६) यानेच हा संपूर्ण दरोडा घडवून आणला. अमोल व याेगेश हाजबेने गंगणेला अंबेजोगाईवरून दरोड्यासाठी बोलावले होते. गंगणेच्या दाव्यानुसार दरोड्यानंतर त्याला व त्याचा मित्र सोहेल जलील शेख (२२, रा. अंबेजोगाई) यांच्या वाट्याला आलेले २०० ग्रॅम सोने मित्रांच्या माध्यमातून सराफा आशिष जयकुमार बाकलीवालला (४२, रा. वजीराबाद, नांदेड) विकल्याची कबुली दिली.

दोघांकडून पाच हजारांचे कमिशन
-गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप साळुंके यांच्या पथकाने गंगणेच्या सोन्याचा तपास करत शेख अबुजर ऊर्फ शाहिद (२३), शेख सोहेल शेख मुस्तफा (२६, दोघे रा. अंबेजोगाई), शेख शाहरूख शेख रफिक (३२, नांदेड) सह बाकलीवालचा सहभाग निष्पन्न केला.
-१५ मेच्या दरोड्यानंतर १८ मे रोजी गंगणेने सोहेलकडे सोने दिले. सोहेलने सोने वितळवून अबुजरला दिले. अबुजरने नांदेडचा चुलत भाऊ शाहरूखमार्फत बाकलीवालला १८ लाख ४० हजारात १९४ ग्रॅम सोने विकले.
-या कामासाठी सोहेल, अबुजर, शाहरूखला गंगणेने ५ हजार रुपये दिले. तिघेही मातीतून सोने गाळून विकण्याचे काम करतात. उपनिरीक्षक बोडखे, साळुंकेच्या पथकाने सोहेलला पुण्यातून, तर इतरांना नांदेडमधून अटक केली.

प्रत्येकी २०० ग्रॅमचीच कबुली
अटकेतील दरोडेखोर, अमोलने त्यांना प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने देऊन उर्वरित सोने व संपूर्ण चांदी स्वत:कडे ठेवल्याचा दावा चौकशीत करत आहेत. आता अमाेलने स्वत:कडे किती सोने ठेवले, कुठे ठेवले, याचा पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत एकूण ६० तोळे सोने हस्तगत झाले आहे.

Web Title: Ladda Robbery case: We got only 200 grams of gold each, Amol Khotkar kept the rest for himself: Robbers claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.