डाटा आॅपरेटरचे कामबंद आंदोलन

By Admin | Updated: July 16, 2014 00:46 IST2014-07-15T23:43:53+5:302014-07-16T00:46:17+5:30

विठ्ठल भिसे, पाथरी ग्रामपंचायतींना त्यांच्या कारभारात सुसूत्रता यावी यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत अंतर्गत संग्राम हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन

The laboratory movement of the data operator | डाटा आॅपरेटरचे कामबंद आंदोलन

डाटा आॅपरेटरचे कामबंद आंदोलन

विठ्ठल भिसे, पाथरी
ग्रामपंचायतींना त्यांच्या कारभारात सुसूत्रता यावी यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत अंतर्गत संग्राम हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला मानधन स्वरुपात डाटा आॅपरेटरच्या नियुक्त्याही केल्या़ परंतु, तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या आॅपरेटरांना चार महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही़ यामुळे १५ जुलैपासून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे डाटा आॅपरेटर्संनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे़
पंचायत राज संस्थानचे बळकटीकरण करून त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतुने केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये संगणकीय ग्राम महाराष्ट्र ई- पंचायत महाआॅनलाईन ही सेवा सुरू करण्यात आली़ या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यामध्ये संग्राम केंद्राची स्थापना करण्यात आली़ या संग्राम केंद्रामध्ये संगणक, स्कॅनर, प्रिंटर, इंटरनेट जोडणी, युपीएस आणि डाटा आॅपरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत़
डाटा आॅपरेटर्संना शासनाकडून दरमहा ३ हजार ८०० ते ४ हजार १०० मानधन संबंधित महाआॅनलाईनकडून देण्याबाबतचा निर्णय घेतला़ जिल्हा परिषदेला १३ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून संबंधित ग्रामपंचायतीच्या डाटा आॅपरेटर सेवेसाठी ८ हजार रुपये कपात करण्यात येतात़ २००१ च्या जनगणनेनुसार १ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना पूर्णवेळ संगणक आणि १ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या तीन ग्रामपंचायतीला एक डाटा आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत़ पाथरी तालुक्यात ३८ डाटा आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून ग्रामपंचायतीचे १ ते २७ नमुने, प्रियासॉफ्ट, लोकसंख्या आॅनलाईन करणे आणि इतर प्रमाणपत्रांची कामे करून घेतली जातात़ तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या डाटा आॅपरेटर्संना पाथरी तालुक्यात चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही़ यामुळे या आॅपरेटर्संवर उपासमारीची वेळ आली आहे़ अनुदान मिळत नसल्याने पाथरी तालुक्यातील सर्वच डाटा आॅपरेटर १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत़ या बाबत दिलेल्या निवेदनामध्ये गणेश कोल्हे, नारायण टाक, संतोष नखाते, सुधीर शिंदे, अविनाश काळे, बळीराम जोगदंड, अमोल इंगळे, रामेश्वर वऱ्हाडे, कर्ण श्रीरंग, चेतन गौण, रामेश्वर घुंबरे, बाबासाहेब टेंगसे, बुलंगे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़
मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावू
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अगोदरच विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत आणि आता ग्रामपंचायतींच्या आॅपरेटरांनीही मानधनासाठी बेमुदत संप पुकारला आहे़ या बाबत पंचायत समिती सभापती अर्चना शंतनु पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ग्रामपंचायतीच्या आॅपरेटरांच्या मानधनाचा प्रश्न दोन-चार दिवसांत मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले़
डाटा आॅपरेटरच्या मानधनातही कपात
महाआॅनलाईन कंपनीकडून डाटा आॅपरेटरांना ग्रामपंचायतीमध्ये काम केल्याबद्दल मानधन देण्यात येते़ परंतु, हे मानधनही एक तर वेळेच्या आत मिळत नाही त्यातही अनेक वेळा कपात केल्या जातो़ यामुळे महाआॅनलाईन एजन्सीकडून डाटा आॅपरेटरांचे शोषण केले जात असल्याचा प्रकारही घडत आहे़
खर्चापोटी येणाऱ्या निधीचे काय?
ग्रामपंचायतीकडून १२ व्या वित्त आयोगातून आॅपरेटरसाठी चार हजार आणि ग्रामपंचायत स्तरावरील कागद, स्टोनर आणि इतर साहित्यासाठी ४ हजार महा-आॅनलाईनकडे देण्यात येतात़ परंतु, या कंपनीकडे देण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा केला जात नसल्याचा प्रकारही निदर्शनास येऊ लागला आहे़

Web Title: The laboratory movement of the data operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.