पीएसआय पूर्व परीक्षा उतीर्ण तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत चालकाला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 15:54 IST2020-03-05T15:48:32+5:302020-03-05T15:54:26+5:30
तरुण पीएसआय मुख्य परीक्षेची तयारी करत होता

पीएसआय पूर्व परीक्षा उतीर्ण तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत चालकाला सश्रम कारावास
औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने दिलेल्या धडकेत महेंद्र माधवराव कोल्हे (३०, रा. वसमत, जि. हिंगोली) हा तरुण जागीच ठार झाला होता. या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी ‘हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या’ आरोपाखाली बसचालक अमर रामनाथ आहेरकर याला सहा महिने सश्रम कारावास आणि १० हजार ६०० रुपये दंड ठोठावला.
या अपघातात ठार झालेला महेंद्र कोल्हे हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तो मुख्य परीक्षेची तयारी करीत होता. खटल्याच्या सुनावणीअंती दुर्घटनेच्या ९ वर्षांनंतर बसचालकाला शिक्षा झाली आहे.महेंद्रचा मित्र विकास कुंभार याने फिर्याद दिली होती की, १२ आॅक्टोबर २०११ च्या रात्री १ वाजेच्या सुमारास महेंद्र आणि विकास दुचाकीवर मिल कॉर्नर ते बाबा पेट्रोल पंपमार्गे जात होते. त्यावेळी कार्तिकी हॉटेलसमोरील चौकात भावना ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात महेंद्रचा जागीच मृत्यू झाला होता, तर फिर्यादी जखमी झाला होता. यासंदर्भात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील आमेर काझी यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले, यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली.
सुनावणीअंती न्यायालयाने बसचालक अमर आहेरकर याला ‘हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या’ आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३०४ (अ) अन्वये ६ महिने सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि ‘दुखापत पोहोचवण्याच्या’ आरोपाखाली कलम ३३७ अन्वये एक महिना सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, तसेच मोटारवाहन कायद्याच्या कलम १३४ अन्वये १०० रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून पंकज चौधरी यांनी सहकार्य केले.