‘कयाधू’चे लोकसहभागातून पुनरुज्जीवन, हिंगोली जिल्ह्यात जलचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:41 IST2018-04-02T04:41:38+5:302018-04-02T04:41:47+5:30
पावसाळ्यात पुराचे आक्राळ-विक्राळ रूप दाखविणारी हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी दुसऱ्याच दिवशी कोरडीठाक होते, त्यामुळे पुराचा सामना करूनही कायम दुष्काळछायेत जगणाºया या जिल्ह्याने लोकसहभागातून त्यावर मात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य पात्राला धक्का न लावता त्याच्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही मोहीम राबविली जाणार आहे.

‘कयाधू’चे लोकसहभागातून पुनरुज्जीवन, हिंगोली जिल्ह्यात जलचळवळ
- गजानन दिवाण
औरंगाबाद - पावसाळ्यात पुराचे आक्राळ-विक्राळ रूप दाखविणारी हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी दुसऱ्याच दिवशी कोरडीठाक होते, त्यामुळे पुराचा सामना करूनही कायम दुष्काळछायेत जगणाºया या जिल्ह्याने लोकसहभागातून त्यावर मात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य पात्राला धक्का न लावता त्याच्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही मोहीम राबविली जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अगरवाडी-कंकरवाडी येथे कयाधू नदीचा उगम झाला आहे. तेथून पायथ्यापर्यंत ही मोहीम राबविली जाईल. ही नदी हिंगोलीतून ८४ किलोमीटर प्रवास करते. ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट नदीला येऊन मिळतात. नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वस्त्या, वाड्या वसल्या आहेत. चार हजार ८३२ कुटुंबे आणि त्यातील दोन लाख ४२ हजार १५२ लोकसंख्येला, शिवाय एक लाख १३ हजार १०० हेक्टर जमिनीला ही नदी प्रभावित करते. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे एरव्ही बारा महिने वाहणारी कयाधू नदी आता हंगामी झाली आहे. परिणामी शेतीला फटका बसून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळी जिल्ह्यात हिंगोलीचे नाव समाविष्ट झाले आहे. कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करुन जिल्ह्याला दुष्काळचक्रातून बाहेर काढण्यासाठी ईडलग्रीव्ह फाऊंडेशनच्या मदतीने उगम संस्थेने वर्षभर ५० जणांच्या पथकाद्वारे जिल्ह्यात प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यातील निरीक्षणानुसार लोकसहभागातून हे काम केले जाणार असल्याचे ‘उगम’चे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सद्य:स्थितीत २२४ कि.मी. खोलीकरण झाले आहे. नवीन कामांमधून होणारे खोलीकरण २३५ कि.मी. असून, ६८८ कि.मी. खोलीकरण करावे लागणार आहे.
अडीच लाख लोकांना लाभ
१५४ गावांमध्ये ४८ हजार ३३२ कुटुंबे राहतात. ही लोकसंख्या दोन लाख ४२ हजार ५१२ आहे.
दोन गावे बदलली; आता १५४ गावे बदलणार!
उगम ग्रामीण विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी आमदरी (ता. औंढा नागनाथ), तेलंगवाडी (ता. कळमनुरी) गावांचा कायापालट केला. आता १५४ गावांचा विकास करण्याचे पाऊल लोकसहभागातून उचलण्यात आले आहे.
या दोन्ही गावांत जलसंधारणाची कामे झाल्यानंतर केलेल्या पाहणीत विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली. जमिनीची सुपीकता वाढली आहे. टँकरशिवाय उन्हाळा न जाणाºया या गावांत आता औषधालाही टँकर येत नाही.
कामे होण्याआधी दोन्ही गावांत ७० टक्के कुटुंबे वर्षाला खरिपाचे साधारण १० क्विंटल पीक काढायचे. जलसंधारणानंतर २७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न ४२ टक्क्यांनी वाढले आहे. रबीचे ६१ टक्के लोकांचे उत्पन्न ४९ टक्क्यांनी वाढले आहे. गावातील प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न साधारण ४२ टक्क्यांनी वाढून ६६ हजारांवर पोहोचले आहे.
कोअर टीम : हिंगोलीकराच्या कोअर टीममध्ये उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजीराव पाईकराव, डॉ. प्रेमेंद्र बोथरा, डॉ. संजय नाकाडे, डॉ. सत्यनारायण तापडिया, रत्नाकर महाजन, प्रकाश इंगोले, प्रकाश सनपूरकर, प्रकाश सोनी, आशिष वाजपेयी, सुनील पाठक, अभय भारतीय आदींचा समावेश आहे.
काय केले जाणार? पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे. सीसीटी, लूट बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे. बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे. जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती व खोलीकरण करणे. शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे. ओढ्याचे खोलीकरण करणे