पोलिसांना दमदाटी करणाऱ्या कुणाल बाकलीवालला तब्बल १४ अटींसह ५० लाखांचे जामीन बंधपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:16 IST2025-02-01T12:15:40+5:302025-02-01T12:16:07+5:30
शहर सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांना कळवणे बंधनकारक असेल; कोणाशी उद्धटपणा नाही

पोलिसांना दमदाटी करणाऱ्या कुणाल बाकलीवालला तब्बल १४ अटींसह ५० लाखांचे जामीन बंधपत्र
छत्रपती संभाजीनगर : पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करणाऱ्या कुणाल दिलीप बाकलीवाल (रा. बीड बायपास) याच्याकडून १४ अटी- शर्तींसह ५० लाख रुपयांचे जामीन बंधपत्र घेत प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले.
२४ जानेवारी रोजी पोलिसांना धमकावणाऱ्या बाकलीवालविरोधात पोलिस सबळ पुरावे मिळवत आहेत. शुक्रवारी पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. उपायुक्त बगाटे यांच्य आदेशावरून बाकलीवालकडून ५० लाख रुपयांचे जामीन बंधपत्र घेतले. यात प्रामुख्याने जामीनदार प्रतिष्ठित नागरिक असावा, कुठलाही दखलपात्र, अदखलपात्र गुन्हा करणार नाही, संविधानिक मूल्यांचे जतन करून सामान्य नागरिक, महिला, आबालवृद्धांसोबत आपुलकीची वागणूक ठेवण्यासह १४ अटी घालण्यात आल्या. प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून त्याला ४ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे.
गैरकृत्य करणाऱ्यासोबतही राहायचे नाही
शहर सोडण्यापूर्वी उपायुक्तांना कळवणे बंधनकारक असेल. गैरकृत्य करणार नाही. गैरकृत्य करणाऱ्यासोबत राहणारही नाही. कोणताही वाद उफाळून येईल, असे कृत्य करणार नाही, वाहतूक नियम पाळून शासकीय नोकरदारांसोबत नीट वागेन. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल आदी बाबी बंधपत्रात नमूद आहेत.
कठोर अटी-शर्ती
बाकलीवालवर प्रतिबंधात्मक कारवाईत कठोर अटी-शर्ती आहेत. उल्लंघन केल्यास न्यायालयात ५० लाख रुपये भरावे लागतील किंवा १५ दिवस न्यायालयीन कोठडीत जावे लागेल. संविधान, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.
-नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त