दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:33 IST2025-02-12T13:28:24+5:302025-02-12T13:33:25+5:30
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सातारा पोलिसांनी कुणाल दिलीप बाकलीवालला न्यायालयात हजर केले.

दर शनिवारी ठाण्यात हजेरीसह सात अटी, शर्थींवर कुणाल बाकलीवालची जामिनावर सुटका
छत्रपती संभाजीनगर : केटरिंग व्यावसायिकाचे बिलाचे पैसे देण्यास नकार देत मारहाण करून सोनसाखळी लुटल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुणाल दिलीप बाकलीवालची न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
वाहतूक पोलिसांवर अरेरावी करून धमकावल्या प्रकरणात २६ जानेवारी रोजी बाकलीवालला अटक झाली होती. त्याच्या बारा दिवसांतच बाकलीवालला सातारा पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली. व्यावसायिक अमित कासलीवाल यांच्या फिर्यादीतील आरोपानुसार, नाेव्हेंबर २०२२, डिसेंबर २०२४ मध्ये बाकलीवालच्या घरी दोन वेळेस काम केले. त्याचे अनुक्रमे १६ व ९ लाखांचे बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला. शिवाय, कमलनयन बजाज रुग्णालयासमोरील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये नेत सागर भानुशाली, अन्य दोन नोकरांनी त्यांना गंभीर मारहाण केली. यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. मंगळवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सातारा पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले.
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रवीण जावळे तर बाकलीवालच्या वतीने ॲड. गोपाल पांडे, शिवम पांडे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर बाकलीवालला जामीन मंजूर केला. गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर शनिवारी सातारा ठाण्यात सकाळी ९ ते ११ या वेळेत हजेरी लावावी व इतर अटी, शर्तींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला.