भांडण सोडविणाऱ्या व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला
By बापू सोळुंके | Updated: May 18, 2023 21:24 IST2023-05-18T21:24:12+5:302023-05-18T21:24:19+5:30
दोन्ही आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी

भांडण सोडविणाऱ्या व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर: ओळखीच्या वाहनचालकाला काही जण मारहाण करीत असल्याचे पाहुन त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जुना मोंढा परिसरात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोंपींना अटक केली आहे.
बशाद शेख अफसर शेख आणि समीर रफीक शेख (रा. भवानीनगर,जुना मोंढा परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यात एक विधी संघर्षग्रस्त १७ वर्षीय मुलगाही आरोपीसोबत होता. घटनेविषयी जिन्सी पोलिसांनी सांगितले की,नितीन नाथाजी गायकवाड (४२ ,रा.बापुनगर खोकडपुरा)असे जखमीचे नाव आहे. नितीन यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे त्यांच्या ओळखीच्या वाहनचालकासोबत मोंढ्यातील एका हॉटेलमध्ये गेले होते.
हॉटेलमधून ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या ओळखीच्याव वाहनचालकास आरोपी मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. हे भांडण सोडविण्यासाठी नितीन गेले असता आरोपीं बशादने त्यांच्यावर चाकूने वार केला.तर दुसऱ्या आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी लोक तेथे जमा होताच आरोपी पळून गेले. उपस्थितांनी त्यांना जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जखमीच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपींविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला.
दोन्ही आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी
या घटनेचा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेख हारूण यांनी प्रथम बशादला पकडल्यानंतर त्याच्या साथीदारांची नावे मिळवून त्यांनाही ताब्यात घेतले. आरोपी बशाद आणि समीर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.