‘सायलंट किलर’चा विळखा वाढतोय
By Admin | Updated: November 25, 2014 00:57 IST2014-11-25T00:37:54+5:302014-11-25T00:57:21+5:30
उस्मानाबाद : मानवी शरिरासाठी ‘सायलंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहासह उच्च रक्तदाब, ह्दयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़

‘सायलंट किलर’चा विळखा वाढतोय
उस्मानाबाद : मानवी शरिरासाठी ‘सायलंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहासह उच्च रक्तदाब, ह्दयरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़ हे आजार जडण्यामागे मानवी जीवनात झालेले बदल कारणीभूत आहेत़ मानवी शरिराला जखडत असलेल्या ‘सायलंट किलर’ आजारांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी ‘फास्टफूड’ टाळण्यासह व्यायम, योगावर करण्यावर भर देणे ही काळाची गरज बनल्याचे आयुर्वेदिक महाविद्यालयातील डॉ़ मयुर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
डॉ़ देशमुख म्हणाले, स्पर्धेच्या युगात मानवाचे जीवनमान वेगाने बदलत आहे़ कामाचा वाढता ताण, अवेळी होणारे जेवण, फास्टफूडची लागलेली सवय आदी कारणांमुळे मानवी शरिरातही मोठे बदल होवू लागले आहेत़ अनेकांनी व्यायाम, योगा यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने शरिराची स्थुलता वाढू लागली आहे़ त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयाच्या आजारासह इतर आजारांनी शरिराला जोखडून ठेवले आहे़ देशात सद्यस्थितीत १८ जणांमागे एका इसमास मधुमेह असल्याचा अहवाल असून, ही आकडेवारी २०३० मध्ये तिघांमध्ये एक रूग्ण अशी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ आयुर्वेदिक महाविद्यालयात या आजारांनी ग्रस्त रूग्ण उपचारासाठी दाखल होतात़ किंवा इतर आजारामुळे करण्यात येणाऱ्या तपासणीतून हे आजार झाल्याचे समोर येते़ येथे येणाऱ्या रूग्णांपैकी ५० टक्क्यांच्या जवळपास हेच रूग्ण आहेत़ तर देशात सद्यस्थितीत मधुमेहामुळे ६़२३ टक्के, उच्च रक्तदाबामुळे १५़९ टक्के तर ०़१५ जणांचा ह्दयाच्या झटक्याने मृत्यू होत आहे़ हे प्रमाण पाहता शासनाकडून असंसर्ग जन्य रोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे़
जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दयरूग्ण, कर्करोग आदींच्या विविध तपासण्या करून रूग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत़ जिल्ह्यात आॅगस्टपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, आजवर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये ४१८ मधुमेहाचे तर तब्बल १०८९ उच्च रक्तदाबाचे रूग्ण आढळून आले आहेत़ मधुमेह, उच्च रक्तदान आणि ह्दयरोग हे सायलंट किलर म्हणून ओळखले जावू लागले आहेत़ यापैकी एकाखाही आजार जडल्यानंतर योग्य उपचार घेतले नाहीत तर इतर दोन्ही आजारही संबंधितांना जखडण्याची शक्यता आयुर्वेदिक रूग्णालयातील डॉ़ मयुर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ शिवाय इतर रूग्णालयातील औषधे सुरू केलेल्या रूग्णांना आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रारंभी आहारातील बदल व पथ्य सांगितले जातात़ त्यानंतर काही महिन्यांनी तपासणी करण्यात येते़ तपासणी अहवालानंतर आवश्यकता वाटली तर संबंधितांना औषधे दिली जातात़ दरम्यान, आजार जखडल्यानंतर मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत अनेक पथ्य-पाण्यासह औषधांवरच जीवन कंठावे लागत आहे़ एकूणच, स्पर्धेच्या युगात मानवी जीवन बदलले असले तरी त्याचा फटका मात्र मानवालाच सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे आजार टाळण्यासाठी वेळेवर जेवण आणि दररोज व्यायाम याला पर्याय नाही़ (प्रतिनिधी)