बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:50 IST2025-08-08T15:41:58+5:302025-08-08T15:50:01+5:30
याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बकऱ्या चारण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; सिल्लोड तालुक्यातील घटना
सिल्लोड : बकऱ्या चारण्यास गेलेल्या तालुक्यातील बोरगाव बाजार येथील दोन अल्पवयीन मुलांचे ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अपहरण करण्यात आले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अरबाज शेख अय्युब (वय १६ वर्षे) व शेख अमान शेख गुलाब (वय १५ वर्षे) अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत.
बोरगाव बाजार येथील शेख अरबाज शेख अय्युब व शेख अमान शेख गुलाब हे दोघे बुधवारी सकाळी घरातील बकऱ्या व काही जनावरे घेऊन गावातील तलावाजवळ असलेल्या खंडोबा महाराज मंदिराजवळ गेले होते. तेथे बकऱ्या चारताना ते अंघोळ करण्यासाठी जवळच असलेल्या तलावाकडे दुपारी १ वाजता गेले. यावेळी त्यांना त्यांच्या एका नातेवाइकांनी अंघोळ का करताय म्हणून विचारणा केली. त्यानंतर ते निघून गेले. दुपारी २ वाजेनंतर दोघेही गायब झाले. सायंकाळी दोन्ही मुले घरी आले नाहीत, म्हणून नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे शेख अरबाज याचा भाऊ शेख फिरोज यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सिल्लोड शहरात सीसीटीव्हीत दिसले
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी सिल्लोड शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही मुले शहरातील एका कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक जाधव हे दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत.