शहरातुन तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल:
By राम शिनगारे | Updated: March 26, 2023 18:08 IST2023-03-26T18:08:02+5:302023-03-26T18:08:13+5:30
मुलींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात.

शहरातुन तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल:
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विविध भागातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पिसादेवी रोडवरील वैशाली ढाब्याजवळील रमाईनगरात राहणारी १७ वर्ष ७ महिन्याची अल्पवयीन तरूणी २४ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेपासून अचानकरित्या घरातून बेपत्ता झाली. तिने घरातील कपडेही सोबत नेल्याची तक्रारीत वडीलांनी म्हटले आहे. रोशनगेट परिसरातील करीम कॉलनी येथील जनता किराणा दुकानाजवळ राहणारी महाविद्यालयीन तरूणी २५ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून घरातून बेपत्ता झाली आहे.
तिसऱ्या घटनेत एमआयडीसी वाळूज परिसरातील रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पंढरपुर येथील सम्राट अशोक विद्यालयात जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे. शहराच्या विविध भागातून बेपत्ता झालेल्या मुलींच्या नातेवाईंकांनी सर्वत्र शोध घेवूनही त्या मिळून आल्या नाहीत. बेपत्ता झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता मुलींचे अपहरण करणार्याविरुद्ध अनुक्रमे सिको, जिन्सी आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.