खैरे-जाधव वादात त्रिवेदी यांची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:39 IST2017-08-19T00:39:08+5:302017-08-19T00:39:08+5:30
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी उडी घेतली आहे.

खैरे-जाधव वादात त्रिवेदी यांची उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी उडी घेतली आहे. आ. जाधव यांनी पिशोर गावात १९ कामे न करताच बिले उचलल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला. या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खा. खैरे यांनी खासदार निधीतून कामे न करताच बिले उचलल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. या आरोपांना खैरे यांनीही प्रत्युत्तर दिले. हा वाद मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर शिवसेना पक्षातून कोणीही अधिकृतपणे खासदार किंवा आमदारांच्या मदतीला धावून गेला नव्हता. मात्र जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी खैरे यांच्या बाजूने वादात उडी घेत आ. जाधव यांनी पिशोर गावात आमदार निधीतून १९ कामे न करताच ५० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी उचलला असल्याचा आरोप केला आहे.
या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. या निवेदनाला पिशोर ग्रामपंचायने गावात कोणतेही काम न झाल्याचा ठराव, खासदारांनी १९ पैकी तीन कामे केल्याची कागदपत्रे जोडली आहेत.