रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १.४४ लाख लिटर मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 18:25 IST2026-04-11T18:20:03+5:302026-04-11T18:25:02+5:30
ग्रामीण भागासाठी 'केरोसीन'चा आधार; रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ, दरनिश्चितीनंतर वितरणाला वेग.

रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १.४४ लाख लिटर मंजूर
छत्रपती संभाजीनगर : आखाती देशातील युद्धामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसीन (रॉकेल) वाटपास मान्यता दिली. ग्रामीण भागातील रेशन दुकानांवरून कार्डधारकांना रॉकेल देण्यात येणार आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील डेपोतून जिल्ह्याला राॅकेलचा पुरवठा होणार असून डेपो ते रेशनदुकानापर्यंत किती अंतर होते, त्याचे दरनिश्चित झाल्यानंतर ग्रामीण भागात रॉकेल वाटप होईल. जिल्ह्याला १ लाख ४४ हजार लिटर रॉकेल मिळणार आहे.
२०१६ पासून रेशन दुकानांवरील रॉकेल वाटप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रॉकेल वाटप करणारी परवानाधारकांनी सगळी यंत्रणा दुसऱ्या व्यवसायात लावली आहे. फक्त एक ते दीड महिन्यासाठी परवानाधारक रॉकेल वाटपास तयार होत नसल्यामुळे सरकारने राज्यातील किरकोळ परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ केली. प्रतिकिलो लिटरसाठीचे हे कमिशन ६७५ रुपयांवरून १३५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने राज्यास ३७४४ किलो लिटर रॉकेल (केएल) एवढे नियतन मंजूर केले आहे.
पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात वितरण
मार्च-एप्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा मंजूर झाला आहे. प्राथमिक टप्प्यात केवळ ग्रामीण भागातच शिधापत्रिकानिहाय केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाभरात प्राधान्य कुटुंब शिधावाटप कार्ड (प्रायोरिटी हाउसहोल्ड, पीएचएच) आणि अंत्योदय कुटुंब कार्ड (अंत्योदय अन्न योजना, एएवाय) या शिधापत्रिकांना प्रत्येकी तीन लिटर रॉकेल वाटप करण्यात येणार आहे.
तालुका ........... कार्डधारक .... रॉकेल वाटप (लिटरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर ... ६१ हजार ९३७ - २४ हजार
गंगापूर ... ४५ हजार ६२३ - १६ हजार २००
कन्नड .... ५५ हजार ६६७ - २१ हजार
खुलताबाद ... २० हजार १८७ - सात हजार ८००
पैठण ... ५३ हजार ४६१ - २१ हजार
फुलंब्री .... २५ हजार ५५५ - ९ हजार
सिल्लोड ... ५३ हजार ९४ - १९ हजार ५००
सोयगाव ... २२ हजार ९४ - ७ हजार ५००
वैजापूर .... ५० हजार २०४ - १८ हजार
एकूण .... ३ लाख ८७ हजार ७३० - १ लाख ४४ हजार
एचपीसीएल या कंपनीकडून रॉकेल पुरवठा होईल. कंपनी डेपो ते रेशनकार्ड धारकांपर्यंत वितरण करण्यात किती अंतर आहे. त्याचे दर निश्चित झाल्यानंतर वाटप सुरू होईल. कंपनी सगळी जबाबदारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात वितरण होईल.
प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी