शेतकऱ्यास न्याय! कपाशी उगवली नाही; हायकोर्टाचा ४ कंपन्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:23 IST2025-10-18T12:22:57+5:302025-10-18T12:23:42+5:30
बोगस बियाणे प्रकरणात सात वर्षांनंतर निकाल

शेतकऱ्यास न्याय! कपाशी उगवली नाही; हायकोर्टाचा ४ कंपन्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ साली कापूस पिकांच्या बियाण्यांची पेरणी केली. मात्र बियाणे बोगस असल्यामुळे पीक हातून गेले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांनी चार कंपन्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला.
छत्रपती संभाजीननगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी याकूब अय्यूब शेख यांनी ९ एकरांवर, २०१८ साली पेरलेले कपाशीचे बियाणे बोगस निघाल्याने पीक हातून गेले. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याकूब शेख यांनी ९ एकरांत राशी, आदित्य, तिअरा व नामधारी सीड्स कंपन्यांचे बियाणे पेरले होते. त्यांनी ७५० रुपयांची ४७५ ग्रॅमची बियाण्यांची नऊ पाकिटे खरेदी केली होती. त्या बियाण्यांच्या पाकिटांवर रोग पडणार नाही, रोगनाशक शक्ती अधिक असल्याचा तसेच लाल्या रोग पडत नसल्याचा कंपन्यांचा दावा होता. असे असताना रोग पडून पीक हातून गेल्याने शेख यांनी राज्याच्या आयुक्तांकडे अर्ज करून दाद मागितली; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.
अत्यल्प भरपाईमुळे कोर्टात धाव
औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिल्यानंतर खंडपीठाने राज्याच्या कृषी आयुक्तांना आदेशित करून शेतकऱ्याची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. कृषी आयुक्तांनी सुनावणी घेतली. २० हजार रुपये भरपाईचे आदेश दिले. भरपाईची रक्कम अत्यल्प असल्याने त्यांनी खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने चारही कंपन्यांना ५० हजार रुपये प्रत्येकी दंड लावत रक्कम याचिकाकर्ते शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. किशोर खाडे यांनी काम पाहिले.