बुद्धिबळ, क्रिकेटला 'न्याय', मग 'खो-खो' विश्वविजेत्या खेळाडूंवर अन्याय का? बक्षीस कधी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:57 IST2025-11-10T11:55:23+5:302025-11-10T11:57:01+5:30
विश्वविजेत्या खो-खो संघातील खेळाडूंवर अन्याय का? राज्य संघटनेचे सरचिटणीस जाधव यांचा सवाल

बुद्धिबळ, क्रिकेटला 'न्याय', मग 'खो-खो' विश्वविजेत्या खेळाडूंवर अन्याय का? बक्षीस कधी देणार?
- जयंत कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी बुद्धिबळ खेळातील जागतिक विजेत्या खेळाडूला तीन कोटी व वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंना तत्परतेने सव्वादोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन तत्परता दाखवली. त्याबद्दल आनंदच आहे. मात्र, तोच न्याय दहा महिन्यांपूर्वी भारताला विश्वचषक खो-खो स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना का नाही. त्यांच्यावर अन्याय का?, असा प्रश्न उपस्थित करीत राज्य खो-खो संघटनेचे सरचिटणीस चंद्रजित जाधव यांनी केला. तसेच आता अन्य खेळांप्रमाणेच विश्विजेत्या खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंनाही पुरस्कार देऊन तशीच तत्परता शासनाने दाखवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांचे बक्षीस राज्य सरकारने दिले. त्याआधी तसेच याच वर्षी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या दिव्या देशमुख राज्य सरकारकडून ३ कोटींचे पारितोषिक देण्यात आले. खेळाडूंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, मराठमोळ्या खेळातील खेळाडूंवर अन्याय झाल्याची भावना जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
२४ देशांचा होता सहभाग
गतकाही वर्षांपासून महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन राहिले आहेत. नवी दिल्ली येथे याच वर्षी १३ ते १९ जानेवादीरम्यान पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत एकूण २४ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना दोन्ही गटांत विश्वविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता.
महाराष्ट्रातील या खेळाडूंचा समावेश
उल्लेखनीय बाब म्हणजे या पुरुष आणि महिला संघाचे कर्णधारपदही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भूषवले होते. पुरुष संघाचे कर्णधारपद प्रतिक वाईकरने तर महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे यांनी भूषवले होते. प्रतिक वाईकर व प्रियंका इंगळे यांच्यासह भारतीय संघात सुयश गरगटे, रामजी कश्यप, आदित्य गणपुले, अनिकेत पोटे, अश्विनी शिंदे, रेशमा राठोड या महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतरही मिळाले नाही बक्षीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथील बालेवाडीत याच वर्षी ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्यांचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला होता. या वेळी विश्वचषक विजेत्या भारतीय खो-खो संघातील खेळाडूंनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली होती. त्या वेळी अजित पवार यांनी क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंची बक्षिसांची रक्कम देण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्यांच्या आदेशानंतरही अद्यापही खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत.
दहा महिने झाले तरी रक्कम नाही
७ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडू व प्रशिक्षक यांना रोख पारितोषिक देण्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मात्र, दहा महिने झाले तरी जागतिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अद्यापही पारितोषिकाची रक्कम प्राप्त झालेली नाही.
- चंद्रजित जाधव, सरचिटणीस, राज्य खो-खो संघटना
तातडीने धनादेश देऊन गौरव करावा
भारतात प्रथमच खो-खो खेळाचे पुरुष आणि महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आणि त्यातही भारताने दोन्ही गटांत वर्ल्डचॅम्पियनचा बहुमान पटकावला. राज्य सरकारने जसा विश्वचषक बुद्धिबळ आणि क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा जसा रोख पुरस्कार देऊन सन्मान केला. त्याच तातडीने खो-खो विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना धनादेश देऊन गौरव करावा.
- ॲड. गाेविंद शर्मा, कोषाध्यक्ष, भारतीय खो-खो महासंघ व राज्य संघटना.