न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करावेत: न्या. मनीष पितळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:26 IST2025-09-03T19:25:22+5:302025-09-03T19:26:22+5:30
औरंगाबाद खंडपीठाचा ४५ व्या वर्धापन दिन: कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे आता औरंगाबाद खंडपीठ हे ज्येष्ठ खंडपीठ झाले

न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करावेत: न्या. मनीष पितळे
छत्रपती संभाजीनगर : राज्यघटनेला अभिप्रेत असलेला न्याय पक्षकारांना मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करणे हे आद्य कर्तव्य आहे. वकील आणि न्यायाधीशांमधील योग्य समन्वयानेच हे साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी केले.
औरंगाबाद खंडपीठाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. विभा कंकणवाडी होत्या. व्यासपीठावर वकील संघाच्या अध्यक्षा ॲड. योगिता थोरात, उपाध्यक्ष ॲड. संदीपान मोरमपल्ले, सचिव ॲड. श्रीकृष्ण चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमास न्या. किशोर संत, न्या. अरुण पेडणेकर, न्या. वाय. जी. खोब्रागडे, न्या. शैलेश ब्रम्हे, न्या. संजय देशमुख, न्या. निरज धोटे, न्या. एस. एम. घोडेस्वार, निवृत्त न्या. एस. बी. देशमुख आदींचीही उपस्थिती होती.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ॲड. शशीकुमार चौधरी, ॲड. सुखदेव शेळके यांचा खंडपीठाच्या स्थापनेसाठी योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात योगिता थोरात, सुखदेव शेळके, ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक, ॲड. अमोल सावंत, ॲड. वसंतराव साळुंके, ॲड. नरसिंह जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ पी. आर. कातनेश्वरकर आदींनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा पूनम बोडखे पाटील यांनी केले. सचिव श्रीकृष्ण चौधरी यांनी आभार मानले.
औरंगाबाद खंडपीठ हे आता ज्येष्ठ खंडपीठ झाले
न्या. पितळे पुढे म्हणाले, वर्धापन दिन हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. न्यायदान प्रक्रियेत वकिलाची भूमिका मदतनीस म्हणून आणि न्यायाधीशाची भूमिका, केवळ त्याच्यासमोरील खटल्यात एक निष्पक्ष आणि निर्भय मध्यस्थ म्हणूनच नव्हे तर पक्षकारांना जलद न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणारी असली पाहिजे, असेही ते म्हणाले. न्या. विभा कंकणवाडी यांनी अध्यक्षीय समारोपात कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे आता औरंगाबाद खंडपीठ हे ज्येष्ठ खंडपीठ झाले असून, तशीच जबाबदारीही वाढली असल्याचे म्हटले. या खंडपीठातून घडलेले अनेक वकील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तिपदी विराजमान झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.