उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: June 25, 2025 19:57 IST2025-06-25T19:56:14+5:302025-06-25T19:57:05+5:30

या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

jouful! Six more companies invest Rs 1261 crore in Bidkin DMIC of Chh. Sambhajinagar | उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक

उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक

छत्रपती संभाजीनगर : येथील ऑरिक सिटींतर्गत असलेल्या डीएमआयसी शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गुंतवणूक करण्याकडे जगभरातील उद्योजकांचा कल वाढत आहे. मागील आठ दिवसांत बिडकीन डीएमआयसीमध्ये नव्याने ६ कंपन्यांनी १२६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या कंपन्यांना दोन दिवसांपूर्वी ऑरिक प्रशासनाने प्रस्तावपत्र दिले.

बिडकीन डीएमआयसीसाठी ८ हजार एकर जमीन संपादित करण्यात आली. या औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. प्लग ॲण्ड प्ले अशा या औद्योगिक वसाहतीत गतवर्षी टाेयटा-किर्लोस्कर, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू- ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रिझोल या कंपन्यांनी गुंतवणुकीच्या घोषणा केल्या. या कंपन्यांसोबतच त्यांच्या व्हेंडर कंपन्यांनीही येथे उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गतवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथे नवीन, नवीन कंपन्यांकडून गुंतवणुकीची घोषणा होत आहे. मागील आठवड्यात एम्ब्रिको कंपनीने १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेच उनो-मिंडा कंपनीने २१० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. या कंपन्यांसोबतच आता आणखी सहा कंपन्यांनी १२६१ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मेटलमन ग्रुप, राखाे इंडस्ट्रीज, टोयडा गोसाई, महिंद्रा असेलो, जुन्ना सोलार आणि एन. एक्स लॉजिस्टिक या कंपन्यांचा यात समावेश आहे.

या सर्व कंपन्यांनी बिडकीनमधील उद्योगसुलभ वातावरणाची पाहणी केल्यानंतर ऑरिककडे जमिनीची मागणी केली. उत्पादन प्रक्रिया, गुंतवणुकीचा तपशील आणि रोजगारनिर्मिती यासंबंधीचे सविस्तर प्रस्ताव त्यांनी सादर केले. त्याची सकारात्मक दखल घेत प्रशासनाने त्यांना जागा दिली. या पार्श्वभूमीवर ऑरिकने सोमवारी या कंपन्यांना ऑफर लेटर (देयकर पत्र) दिल्याची माहिती व्यवस्थापक महेश शिंदे पाटील यांनी दिली.

या आहेत नवीन कंपन्या
मेटलमन ग्रुप

किती जमीन?- ७ एकर
गुंतवणूक- १८७ कोटी
थेट रोजगार- ५८८
------------------------------------------------
राखो इंडस्ट्रीज प्रा.लि.
जमीन- ७ एकर
गुंतवणूक- ९३ कोटी
थेट रोजगार- ५५०
--------------------------------
टोयडा गोसाई प्रा.लि.
जमीन--१० एकर
गुंतवणूक- १४० कोटी
थेट रोजगार- ५००
---------------------------------
महिंद्रा असेलो प्रा. लि.
जमीन- १३ एकर
गुंतवणूक- ३५५ कोटी
थेट रोजगार- २००
-----------------------------
जुन्ना सोलार प्रा. लि.
जमीन- १० एकर
गुंतवणूक- ४०० कोटी
थेट रोजगार- १०५०
-----------------------
एन. एक्स. लॉजिस्टिक
जमीन- १३ एकर
गुंतवणूक- ८६ कोटी
थेट रोजगार- ४००

नवीन गुंतवणुकीने मराठवाड्याची भरभराट
छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी सहा प्रतिष्ठित कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्याच्या क्षमतेवर आणि येथे विकसित होणाऱ्या मजबूत पायाभूत सुविधांवर आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांचा विश्वास वाढल्याचे पुन्हा एकदा दिसून येतो. नव्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार नाही तर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.
- उत्सव माछर, उपाध्यक्ष, सीएमआयए

नवीन व्यवसाय उपलब्ध
ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरची नवीन ओळख आता इव्ही हब अशी होत आहे. नव्याने येत असलेल्या सहा कंपन्यांमुळे रोजगार निर्मिती होणार आहे. लघू उद्योगांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नवीन व्यवसाय उपलब्ध होईल.
-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ

Web Title: jouful! Six more companies invest Rs 1261 crore in Bidkin DMIC of Chh. Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.