कुटुंबाला सांगायला पेट्रोल पंपावर नोकरी, प्रत्यक्षात दुचाकी चोरी; पत्नीला अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:15 IST2024-12-25T13:15:37+5:302024-12-25T13:15:58+5:30

नव्याने गुन्हेगार बनलेला तरुण अटकेत : जवळपास वीस दुचाकी चोरल्याची कबुली

Job at petrol pump to tell family, actually bike theft | कुटुंबाला सांगायला पेट्रोल पंपावर नोकरी, प्रत्यक्षात दुचाकी चोरी; पत्नीला अश्रु अनावर

कुटुंबाला सांगायला पेट्रोल पंपावर नोकरी, प्रत्यक्षात दुचाकी चोरी; पत्नीला अश्रु अनावर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित मॉल, रुग्णालयासमोरून दुचाकी चोरणाऱ्या पवन रामचंद्र सुरासे (२३, रा. मुठाड, भोकरदन, ह.मु. रामनगर, मुकुंदवाडी) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रंगेहाथ अटक केली. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत त्याने चोरलेल्या १५ दुचाकी जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नवा विक्रम रचला आहे. ८९० पेक्षा अधिक दुचाकी ११ महिन्यांमध्ये चोरीला गेल्या आहेत. यात प्रामुख्याने प्रोझोन मॉल, शहानूरमियाँ दर्गा परिसर, घाटी व एमजीएम रुग्णालयाच्या आवारातून चोरीला गेल्या. प्रोझोन मॉलसमोरील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. २१ डिसेंबर रोजी सहायक निरीक्षक भरत पाचोळे हे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना त्यांना फुटेजमधील त्याच कपड्यांमध्ये विना क्रमांकाच्या दुचाकीवर एक संशयित तरुण दिसला. पोलिसांच्या वाहनाला पाहताच त्याने पळ काढल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीदेखील एमजीएमसमोरून चोरल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत त्याने उर्वरित चोऱ्यांची कबुली दिली. उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार हैदर शेख, संतोष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनवणे, अरविंद पुरी, विनोद कानपुरे यांनी कारवाई पार पाडली.

प्रेमविवाह करून नोकरीसाठी शहरात
बारावी उत्तीर्ण पवनने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. त्याचे वडील शेतकरी आहेत. नोकरीच्या निमित्ताने सहा महिन्यांपूर्वीच शहरात राहण्यासाठी आला होता. पेट्रोल पंपाची नोकरी सोडून त्याने दुचाकी चोरी सुरू केली. आपला पती नोकरीच्या नावाखाली दुचाकी चोरी करत असल्याचे कळाल्यानंतर ठाण्यात गेलेल्या पवनच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते. त्याच्याकडून आणखी चार दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

स्वतःच्याच गावकऱ्यांना गंडा
चोरलेल्या बहुतांश दुचाकी पवनने स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना विकल्या. हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने गाड्या जप्त केल्या असल्याची थाप त्याने मारून २०-२५ हजार रुपयांत गाड्या विकल्या.

Web Title: Job at petrol pump to tell family, actually bike theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.