म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 19:56 IST2024-08-01T19:49:57+5:302024-08-01T19:56:15+5:30
आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली.

म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले
खुलताबाद: प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ घाटात बुधवारी रात्री ८ वाजता एसयुव्ही जीप ४० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने झाडाला अडकल्याने जीपमधील सर्व ७ जणही बचावले. आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली.
म्हैसमाळ घाट रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून चालू असून त्यातच पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्याने म्हैसमाळ घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा येथील काही युवक पर्यटनासाठी जीपमधून ( क्रमांक एम एच १७ सीके ८०५५) म्हैसमाळ येथे आले होते. पर्यटन झाल्यानंतर रात्री ८ वाजता परतत असताना घाटाच्या पहिल्या वळणावरून जीप खाली दरीत कोसळली. ४० फुट खोल गेल्यानंतर एका झाडाला जीप अडकली. यामुळे कारमधील सातही युवक थोडक्यात बचावले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, अपघातानंतर पर्यटकांनी स्थानिक मित्रपरिवारास संपर्क साधून मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर रात्रीच सर्व युवक छत्रपती संभाजीनगरकडे निघून गेले. आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या सहाय्याने जीप दरीमधून बाहेर काढण्यात आली. याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. जीप बाहेर काढून युवक परतले, असल्याची माहिती खुलताबाद पोलीसांनी दिली.