जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:31 IST2025-07-31T19:30:12+5:302025-07-31T19:31:14+5:30
जायकवाडी धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) 91.47 टक्के क्षमतेने भरल्यामुळे गुरुवारी दुपारी धरणाचे 18 दरवाजे ०.5 फुट उचलून 9 हजार 432 क्युसेक (267.08 क्युमेक) पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि उर्ध्व धरणांतून होणाऱ्या जोरदार आवकेच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.
धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फूटाने उघडण्यात आले आहेत. पाण्याची सतत वाढती आवक लक्षात घेता, पुढील काही तासांत विसर्गाचे प्रमाण वाढवला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
दरम्यान, 1 जून रोजी जायकवाडी धरणात केवळ 29 टक्के साठा होता. मात्र, गेल्या आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्याने साठा झपाट्याने वाढून आज 91.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून आतापर्यंत 50.45 टीएमसी पाण्याची आवक जायकवाडीत झाली आहे. तसेच धरणात सध्या 15 हजार 587 क्युसेक (441.36 क्युमेक) पाण्याची आवक सुरू आहे. यावर्षी लवकरच विसर्ग सुरू झाल्याने कृषी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळणार आहे. 2019-20 नंतर गेल्या 5 वर्षांतील हा चौथा धरणभराव ठरला असून, यंदा पाणीसाठ्याच्या बाबतीत समाधानकारक स्थिती दिसून येते असल्याने शेतकरी चिंतामुक्त आहेत.
जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा #jayakwadidam#Chhatrapati_Sambhajinagar#marathwadapic.twitter.com/q4mAkyBrUV
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 31, 2025
एकूण 10 हजार 532 क्युसेक विसर्ग सुरु
यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाची तुटवडा असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र नंतर पावसात वाढ झाल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. मात्र, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 1100 क्युसेक ( 31.15 क्युमेक) पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरु आहे. 18 दरवाजे ०.5 फुट उचलून 9 हजार 432 क्युसेक विसर्ग आणि उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक असा एकूण 10 हजार 532 क्युसेक विसर्ग सुरु आहे.