जायकवाडी @ ५०%; चोवीस तासात १० टक्क्यांची वाढ, १ लाख क्युसेक्स पेक्षाजास्त विक्रमी आवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:53 IST2022-07-13T19:53:09+5:302022-07-13T19:53:31+5:30
मोठ्या क्षमतेने आवक झाल्याने २४ तासात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत अडीच फूटाची वाढ

जायकवाडी @ ५०%; चोवीस तासात १० टक्क्यांची वाढ, १ लाख क्युसेक्स पेक्षाजास्त विक्रमी आवक
पैठण (औरंगाबाद) : नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी व स्थानिक मुक्त पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने बुधवारी धरणात १०५१६४ ( एकलाख पाच हजार एकशै चौसष्ट ) अशी विक्रमी आवक सुरू होती. रात्री ६ वाजता धरणाचा जलसाठा ५०% पेक्षा जास्त झाला होता. गेल्या २४ तासात जलसाठ्यात १०% ने वाढ झाल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यासह विविध धरणातून होणारा विसर्ग बुधवारी घटविण्यात आल्याने गोदाकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायंकाळी दारणा ८८४६, कडवा २५९२, गंगापूर ८८८० तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ३५७५२ क्युसेक्स असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू होता. मोठ्या क्षमतेने आवक झाल्याने २४ तासात जायकवाडी धरणाच्यापाणीपातळीत अडीच फूटाची वाढ झाली असून ७ टीएमसीने जलसाठ्यात वाढ झाल्याचे गणेश खराडकर यांनी सांगितले. धरणात उपयुक्त जलसाठा १०५७. ३०३ दलघमी झाला आहे.