कावीळ म्हणजे शरीरात हळूहळू पसरणारा ‘सायलेंट किलर’च; काय आहेत लक्षणे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:55 IST2025-07-28T16:47:39+5:302025-07-28T16:55:01+5:30
जागतिक कावीळ दिन विशेष: लवकर निदान झाल्यास त्याला रोखता येते, उपचार करता येतो.

कावीळ म्हणजे शरीरात हळूहळू पसरणारा ‘सायलेंट किलर’च; काय आहेत लक्षणे?
छत्रपती संभाजीनगर : ‘एखादी छोटीशी चूक आयुष्यभराचे दु:ख देऊ शकते...’ अगदी हेच सांगणारा आजचा दिवस म्हणजे जागतिक कावीळ दिन. शरीरात हळूहळू पसरणारा हा ‘सायलेंट किलर’ अजूनही अनेकांना माहिती नसलेला, वेळेत निदान न झाल्यास प्राणघातक ठरू शकणारा आजार आहे. परंतु, त्याचे लवकर निदान झाल्यास त्याला रोखता येते, उपचार करता येतो. रुग्ण बरेदेखील होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक कावीळ दिन साजरा केला जातो. हिपॅटायटीस म्हणजेच कावीळ विषाणूंचे मुख्य प्रकार ए, बी, सी, डी, ई हे आहेत. हिपॅटायटीस ए आणि ई हे सहसा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतात, तर हिपॅटायटीस बी आणि सी संक्रमित रक्त किंवा शरीरातील द्रवपदार्थांद्वारे पसरतात. कावीळ शरीरात वर्षानुवर्षे कोणत्याही लक्षणांशिवाय राहू शकतो. यकृताला मूकपणे हानी पोहोचवत राहतो. अनेकदा लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
काय खबरदारी घ्याल?
- उकळलेले अथवा फिल्टर केलेले पाणीच प्यावे.
- उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे.
-रक्तदान, इंजेक्शन यावेळी सजगतेने वागावे.
- ‘कावीळ-ब’ च्या प्रतिबंधासाठी लस घ्यावी.
- मद्यपान टाळणे, आरोग्यदायी आहार घ्यावा.
घाटीतील हिपॅटायटीस ओपीडीतील स्थिती
- किती हिपॅटायटीस बी रुग्णांवर उपचार?: १३३६
- हिपॅटायटीस बी व गरोदर महिला : ११८
-हिपॅटायटीस सी पाॅझिटिव्ह रुग्ण : १३९
-हिपॅटायटीस सी व गरोदर महिला : १
मद्यपान टाळा, आरोग्यदायी आहार घ्या
हिपॅटायटीस सुरू होण्यापूर्वीच, न होऊ देण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण. ‘हिपॅटायटीस बी’ ची लस खूप प्रभावी आहे. ती सर्व नवजात बालकांना तसेच जोखीम असलेल्या प्रौढांना दिली पाहिजे. मद्यपान टाळणे, आरोग्यदायी आहार, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे आणि लसीकरण करणे यासारख्या साध्या सवयी यकृताचे रक्षण करण्यात खूप मदत करू शकतात.
- डॉ. उन्मेश टाकळकर, पोटविकार, कर्करोगतज्ज्ञ व एंडोस्कोपीक सर्जन
कावीळच्या रुग्णांसाठी ओपीडी
घाटीतील मेडिसीन विभागातर्फे २०१९ पासून कावीळच्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू आहे. ‘हिपॅटायटीस ए’ हा लिव्हरमध्ये घर करतो. त्यामुळे लिव्हर सोरायसिस होतो. ‘हिपॅटायटीस सी’ हाही लिव्हरवर परिणाम करतो. परंतु औषधोपचाराने ते पूर्ण बरे होऊ शकते. आपल्याकडे औषधोपचाराने अनेक रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत.
- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी