विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:30 IST2025-02-21T15:26:14+5:302025-02-21T15:30:02+5:30
या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५वा दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २२) दुपारी ३:२० वाजता सुरू होणार आहे. या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. वैशाली खापर्डे, डॉ. वीणा हुंबे, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. मुस्तजिब खान आणि डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित असणार आहेत. कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी व्यासपीठावर उपराष्ट्रपतींसह त्यांची पत्नी, कुलपती, डॉ. भागवत कराड आणि कुलगुरू अशी पाच जणांचीच आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतींची सुरक्षा अतिशय कडक असल्यामुळे अनेक बाबींवर निर्बंध आल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी एकूण ३० समित्यांची स्थापना केलेली आहे.
१०६ जणांना विद्यावाचस्पती
दीक्षांत समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ व मार्च-एप्रिल २०२४ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण होईल. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी आणि १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या १०६ संशोधकांनाही पदवी मिळेल. पदवीधरांची संख्या ४२ हजार ६६६, पदव्युत्तर पदवी १३ हजार १८७, एम.फिल १६ व पीएच.डी.धारक १०६ जण, अशा एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी वितरण होईल.
चार इमारतींचे ऑनलाइन भूमिपूजन
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पीएम उषा प्रकल्पांतर्गत चार इमारतींचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘स्ट्रेस बस्टर रिक्रेशन फॅसिलिटी सेंटर’, सेंटर फॉर फोक अँड कल्चरल स्टडीज ऑफ मराठवाडा, स्टुडंट्स फॅसिलीट इन लायब्ररी अँड रीडिंग रूम आणि सेंटर फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या चार इमारतींचा समावेश आहे.