जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत बाजार बंदने ९ कोटींचे व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:34 IST2025-04-25T19:34:27+5:302025-04-25T19:34:41+5:30

जिल्हा व्यापार महासंघाची मध्यस्थीही निष्फळ

Jadhavwadi Agricultural Produce Market Committee's Adat Bazar closure halts transactions worth 9 crores | जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत बाजार बंदने ९ कोटींचे व्यवहार ठप्प

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत बाजार बंदने ९ कोटींचे व्यवहार ठप्प

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रस्ते व रिकाम्या जागेवरील बांधकामाचा वाद न्यायालयात पोहचला आहे. दुसरीकडे यासंदर्भात आडत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला गुरुवारी पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दिवसभरात फळ-भाजीपाला व धान्य आडत बाजारात मिळून सुमारे ८ ते ९ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

सेल हॉलच्या उत्तर बाजूला कृउबाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार बांधकामाला सुरुवात केली. अशा प्रकारे अन्य सेल हॉलच्या बाजूच्या रिकाम्या जागेवरही भविष्यात बांधकाम होणार आहे. यास आडत व्यापाऱ्यांनी विरोध केला. कारण, रजिस्ट्री करताना सेल हॉलच्या बाजूची जागा रिकामी दाखविण्यात आली होती. तेथे रस्ता दाखविला होता. नवीन बांधकामामुळे सेल हॉलमधील दुकानामागे मालट्रक येण्यास अडचण येत आहे. हे बांधकाम त्वरित रोखावे व रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आडत व्यापाऱ्यांनी केली व गुरुवारी कडकडीत बंद पाळला.

या आंदोलनास मराठवाडा लेबर युनियननेही पाठिंबा दिला. आडत व्यापारी व हमाल वर्ग दिवसभर सेल हॉलसमोर बसून होते. यात हरीश पवार, इसा खान, राजेंद्र बाशा, कन्हैयालाल जैस्वाल, संजय पहाडे, ऋषी साहुजी, कृष्णा पारख, शिवा गुळवे, भगवान बागवे, धनंजय मुगदिया, अंकुश दायमा, विकास गायके, जावेद खान, मुसा खान यांच्यासह सर्व आडत व्यापारी सहभागी झाले होते.

जिल्हा व्यापारी महासंघाने या प्रकरणी गुरुवारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण ती निष्फळ ठरली. यात महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, लक्ष्मीनारायण राठी, शिवशंकर स्वामी, ज्ञानेश्वर खर्डे, सरदार हरिसिंग यांचा समावेश होता. बंद कोणाच्या हिताचा नाही, मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. पण आडत व्यापाऱ्यांनी नकार दिला.

आज धान्याचा आडत बाजार बंद
शुक्रवारी फळ व भाजीपाला आडत बाजाराला साप्ताहिक सुटी आहे. धान्याच्या आडत बाजारातील व्यवहारही आज बंद राहणार आहे. पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आल्याची माहिती आडत व्यापारी हरीश पवार यांनी दिली.

प्लॉट २९ वर्षांच्या लीजवर
कृउबा संचालक मंडळ बाजार समितीच्या कायद्यानुसार व पणन संचालकांची रिव्हाईज मास्टर प्लॅनला मंजुरी व १२/ १ ची मान्यता घेऊन, ऑनलाईन टेंडर करून सर्व कायदेशीररित्या बांधकाम करीत आहे. सेल हॉल ५ येथे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल उभारले जात आहे. तसेच मोकळी जागा विकत नाहीत, त्या २९ वर्षांच्या लीजवर दिल्या जात आहेत. त्यातून मिळालेल्या भाड्यातून कृउबाचे उत्पन्न सुरू होईल.
- राधाकिसन पठाडे, सभापती, कृउबा समिती

संचालक मंडळ बरखास्त करा
कृउबामधील रिकामी जागा ५०० रुपये चौ. फूटचा सरकारी भाव असताना अनधिकृतपणे दलालामार्फत अडीच ते तीन हजार रुपये चौ. फुटाने विकली जात आहे, असा आरोप व्यापारी करीत आहेत. मालट्रक येण्यासाठीही जागा सोडली जात नाही. शेतीमालाचे नुकसान, व्यापाऱ्यांचा बंद व मनपाने सील ठोकले या तिन्हींची जबाबदारी ठेवून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे.
- जगन्नाथ काळे, संचालक, कृउबा

Web Title: Jadhavwadi Agricultural Produce Market Committee's Adat Bazar closure halts transactions worth 9 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.