छत्रपती संभाजीनगर : कामानिमित्त मुलासह फुलंब्रीला जाताना सुसाट कारने उडविल्याने गंभीर जखमी झालेले आयटकचे नेते अनिल अंबादास जावळे (६८, रा. शिवनेरी कॉलनी) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हर्सुल रोडवरील फुलेनगराजवळ हा अपघात झाला.
चोवीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या देवगिरी टेक्स्टाइल मिलमध्ये अनिल कामगार नेते होते. त्यांना शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारदेखील प्राप्त झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जावळे हे संलग्न आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे नेते म्हणून काम करत होते. शुक्रवारी रात्री ते कामानिमित्त दुचाकीने मुलासह फुलंब्रीकडे जात होते. हर्सुलच्या फुलेनगरजवळ त्यांची दुचाकी अचानक बंद पडली. दुचाकी बंद पडली म्हणून त्यांचा मुलगा अभिजित (३२) दुचाकी बाजूला घेत असतानाच मागून जाणाऱ्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली. यात अनिल व अभिजित दोघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने अनिल यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर एन-११ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे, सून, जावई असा परिवार आहे. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वाहनाचा शोध सुरू असल्याचे अंमलदार रामेश्वर थांगे यांनी सांगितले.